गेल्या आठवड्यात कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील वादाने २६ डिसेंबर रोजी सेंच्युरियन क्रिकेट मैदानावर सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण ‘बॉक्सिंग डे’ कसोटी मालिकेआधी लक्ष वेधून घेतले.
टी-२० संघाच्या नेतृत्वावरून कोहलीने गांगुली यांच्यासोबत संवादच झाला नव्हता, असा गौप्यस्फोट करीत वादाला तोंड फोडले. गांगुलींनी काहीही समजावले नव्हते, असे सांगून विराटने धक्कादायक खंडन केले. यामुळे दोघांमध्ये विसंवाद तसेच विरोधाभास असल्याचे संकेत गेल्याने भारतीय क्रिकेटची प्रतिमा मलीन झाली.
द. आफ्रिकेकडे संघ रवाना होण्यापूर्वी कोहलीने पत्रकार परिषदेत उपस्थित केलेल्या मुद्द्यावर बीसीसीआयला नक्कीच बाजू मांडावी लागेल, परंतु या क्षणी संघ दक्षिण आफ्रिकेत कशी कामगिरी करतो याला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. बीसीसीआयसाठी आणि विशेषत: जो फलंदाज आणि कर्णधार म्हणून दडपणाखाली असलेल्या कोहलीसाठी ही वेळ फारच महत्त्वाची आहे.
भारताने दक्षिण आफ्रिकेत कधीही मालिका जिंकलेली नाही. कोहलीला इतिहास रचण्याची आता अप्रतिम संधी असेल. याआधी त्याने २०१८ ला ऑस्ट्रेलियात अभूतपूर्व मालिका जिंकणाऱ्या भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. द. आफ्रिका सध्या कागदावर तरी बलाढ्य वाटत नाही. भारताने अखेरचा दौरा केला तेव्हा प्रोटीज संघात ए बी डिव्हिलियर्स, हाशिम आमला, फाफ डु प्लेसिस आणि डेल स्टेन होते. सर्वजण जागतिक दर्जाचे खेळाडू होते. त्यांनी संघाला चुरशीच्या मालिकेत २-१ ने विजय मिळवून दिला होता. तरीही भारताच्या दमदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक झाले. फलंदाजीत कोहली चमकदार फॉर्ममध्ये होता आणि त्याने आक्रमक नेतृत्व केले; पण इतर फलंदाजांच्या पुरेशा पाठिंब्याशिवाय गोलंदाजांनी, विशेषतः इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि नवोदित जसप्रीत बुमराह यांनी सर्वस्व पणाला लावल्यानंतरही भारताला मालिका विजय मिळविता आला नव्हता.
यंदा भारताची फलंदाजी कागदावर दमदार दिसत असली तरी चिंता बाळगण्यासारख्या अनेक बाबी आहेत. दुखापतीमुळे रोहित शर्माची अनुपस्थिती म्हणजे गेल्या दोन वर्षांतील संघाचा सर्वोत्तम फलंदाज नसणे. रोहितकडे बलाढ्य गोलंदाजांचा मारा पेलण्याची चांगली क्षमता आहे. फलंदाजीतील समस्या येथेच संपत नाही. भारताची मधली फळी सध्या सर्वाधिक संघर्ष करताना दिसते. पुजारा, रहाणे आणि कोहली स्वत: २०१९ पासून धावा काढण्यात माघारत आहेत. केवळ अनुभवाच्या आधारे पुजारा-रहाणे संघाचा भाग बनले. अशावेळी कोहलीचे फॉर्ममध्ये परतणे त्याच्यासाठी आणि संंघासाठीही लाभदायी ठरेल.
मालिका विजयाची विराटकडे संधी
मागच्या द. आफ्रिका दौऱ्यात विराट सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. दोन वर्षांपासून मात्र त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडताना दिसत नाही. २०१९ नंतर कोहलीने कुठल्याही प्रकारात शतक ठोकलेले नाही. मोठी खेळी करताना त्याच्यावर मानसिक दडपण येते. याचा फटका संघाला सोसावा लागतो. द. आफ्रिकेची फलंदाजी कमकुवत आहे, असे मानले तरी गोलंदाजी तितकी कमकुवत वाटत नाही, घरच्या स्थितीत कॅगिसो रबाडा, एन्रिच नोर्खिया, प्रिटोरियस आणि फिरकीपटू तबरेज शम्सी हे भारतीय फलंदाजांची परीक्षा घेतील. अशावेळी कोहलीची भूमिका निर्णयक असेल. झाले गेले विसरून स्वत:च्या कामगिरीद्वारे उत्तर देण्याची वेळ आता आलेली आहे.
Web Title: ayaz memon said It is time to move on
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.