Join us  

कोहलीने धडाका दाखवून जखम भरून काढावी: अयाज मेमन

रविवारी तिसऱ्या आणि निर्णायक लढतीत भारत जिंकेल? याचा वेध घेणे कठीण झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 7:41 AM

Open in App

भारताचाद. आफ्रिका दौरा दुस्वप्नात बदलला. पहिली कसोटी जिंकल्यानंतरही नंतरच्या दोन सामन्यांत भारताने शरणागती पत्करली. यानंतर वन डे मालिकेच्या दोन सामन्यांतही तशीच गत झाली. आता क्लीन स्वीप होण्याची स्थिती आहे. आज रविवारी तिसऱ्या आणि निर्णायक लढतीत भारत जिंकेल? याचा वेध घेणे कठीण झाले आहे.

चाहत्यांची कोहलीकडून अपेक्षा

अनुभवात कमकुवत मानल्या गेलेल्या यजमान संघाविरुद्ध भारत हमखास बाजी मारील अशी स्थिती होती. रोहित शर्माच्या अनुपस्थितीतही भारतीय संघ ताकदिनिशी उतरला होता. भारताला वन डे मालिका जिंकता तर आली नाही; पण दिलासादायी विजय मिळवून नामुष्की टाळण्याची उद्या मोठी संधी असेल. पराभव म्हणजे अर्थात व्हाइटवॉश... तो विनाशकारी ठरावा. विराट कोहलीसाठी सांघिक आणि वैयक्तिकरीत्या अखेरचा सामना  महत्त्वपूर्ण आणि आव्हानात्मक असेल. त्याने स्वत:च्या शैलीत खेळ करीत सामना जिंकून दिल्यास त्याला स्वत:ला आणि भारतीय चाहत्यांना मोठा दिलासा लाभणार आहे. यामुळे पराभवाच्या जखमा काही अंशी भरूनही निघतील.

द. आफ्रिकेने उलटविली बाजी

याआधी भारत येथे कधीही कसोटी मालिका जिंकला नव्हता. सेंच्युरियनच्या विजयाने इतिहास घडेल, असे वाटत होते. तथापि, आफ्रिकेच्या दृढनिश्चयी खेळाडूंनी भारताला चारीमुंड्या चीत केले. कसोटीप्रमाणे भारताने पहिल्या दोन्ही वन डेत संधी घालवली. पहिल्या सामन्यात धवन-कोहली यांच्यातील भागीदारीमुळे लक्ष्य गाठणे शक्य होईल, असे दिसत असताना कोहली बाद होताच डाव गडगडला. दुसऱ्या लढतीत भारत २८७ धावांचा बचाव करू शकला नाही. द. आफ्रिकेने हे आव्हान तब्बल सात गडी शिल्लक राखून मोडीत काढले. दुसऱ्या सामन्यात ऋषभ पंतने चांगली चमक दाखविली, पण गोलंदाजीत भेदकता जाणवलीच नाही. क्षेत्ररक्षणही ढिसाळ होते. आता रविवारी भारताने बाजी मारल्यास जखमेवर मलम लावल्यासारखे ठरणार आहे.

कोच राहुल द्रविड अडचणीत

पराभवांमुळे नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या समस्यांमध्ये भर पडली. २०२३च्या विश्वचषकासाठी संघ बांधणी करण्याचे स्वप्न बाळगणारे द्रविड निराश असावेत. तिसऱ्या सामन्यात ते सिराज आणि जयंत यादव यांसारख्या राखीव बाकावरील खेळाडूंना संधी देण्याच्या त्यांच्या हेतूंना खीळ बसली आहे. दोन्ही मालिका पराभवांशिवाय विराटचे कसोटी नेतृत्व सोडणे, यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ माजली. दौऱ्याआधी त्याने टी-२०चे नेतृत्व सोडले, तर वन डे कर्णधारपद विराटकडून काढून घेण्यात आले होते. यामुळे कोहली आणि बीसीसीआय प्रमुख गांगुली यांच्यातील वादही चव्हाट्यावर आला होता. दोन कसोटी सामने गमावताच कोहलीने स्वेच्छेने नेतृत्व सोडले, असे मानले, तरी बीसीसीआयशी बिनसलेले त्याचे संबंध नजरेआड करता येणार नाहीत. यामुळे कोहलीच्या कथेचा अखेरचा भाग पुढे आलाच नाही, अशी शंका घ्यायला वाव आहे.

पुढील कसोटी कर्णधार कोण?

नवा कसोटी कर्णधार कोण, यावरून निवड समिती आणि बीसीसीआय कोंडीत सापडले आहेत.  दुखापत होण्याआधी रोहित शर्मा द.आफ्रिका दौऱ्यात उपकर्णधार होता. रोहित सध्या तरी तर्कसंगत पर्याय आहे.  दुसरीकडे त्याला वारंवार होणाऱ्या फिटनेसच्या समस्येमुळे बोर्ड गोंधळातही आहे. कोहलीचा संभाव्य उत्तराधिकारी कोण? लोकेश राहुलचे नाव प्रकर्षाने पुढे येते. द.आफ्रिकेत राहुलने कसोटी आणि वन डेत नेतृत्व केले. अनुभवी ऑफ स्पीनर अश्विन, युवा ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्याकडेही नेतृत्वासाठी पाहिले जात आहे. पुढची कसोटी मालिका महिनाभरानंतर होणार असल्याने, तणावातही बीसीसीआयला श्वास घेण्यास थोडा वेळ मिळणार आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारतद. आफ्रिका
Open in App