आयपीएल २०२२ मध्ये भारतीय वेगवान गोलंदाजीत विलक्षण प्रतिभा पाहायला मिळाली. ‘सनरायजर्स’चा २० वर्षांचा जम्मूचा उमरान मलिक १५० किमी वेगवान चेंडू टाकताच प्रकाशझोतात आला. याशिवाय इतर अनेक तरुण वेगवान गोलंदाजांनीदेखील अमिट ठसा उमटविला.
लखनौ सुपर जायंट्सकडून खेळणारा २३ वर्षांचा डावखुरा मोहसीन खान यापैकी एक. उत्तर प्रदेशातील संभलचा राहणारा, सुरुवातीच्या काही सामन्यांत मोहसीन बाकावर बसून होता. मात्र, ब्रेक मिळताच त्याने मागे वळून पाहिलेले नाही. केवळ सहा सामन्यांत त्याने उत्कृष्ट मारा करीत दहा गडी बाद केले. मोहम्मद शमीच्या नेतृत्वात मोहसीनने नियंत्रण आणि कौशल्य आत्मसात केले. दिग्गज सुनील गावस्कर यांनीही मोहसीनची पाठ थोपटली आहे.
आवेश खान, खलील अहमद, प्रसिद्ध कृष्णा (राजस्थान रॉयल्स), चेतन सकारिया (दिल्ली कॅपिटल्स), अर्शदीप सिंग (पंजाब किंग्स) हे तर निवडकर्त्यांच्या रडारवर आहेतच. झटपट क्रिकेटमध्ये भारतीय संघात ते उपयुक्त कामगिरी करू शकतील. विशेष असे की, वेगवान गोलंदाज देशाच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत. उमरान जम्मू-काश्मीर, मोहसीन आणि यश दयाल हे यूपीचे, आवेश खान आणि कुलदीप सेन हे मध्य प्रदेश आणि खलील अहमद राजस्थानमधून येतो. मुकेश चौधरीचा जन्म राजस्थानचा, पण तो पुण्यात स्थायिक झाला. चेतन सकारिया सौराष्ट्रचा, तर प्रसिद्ध कृष्णा कर्नाटकचा आहे. ही अंतिम यादी नाही. प्रत्येक फ्रॅन्चायजीने भविष्याचा वेध घेत आणखी काही तरुण वेगवान गोलंदाजांची फळी उभारली. यातील अनेकजण १४० किमी वेगवान मारा करण्यास सज्ज असल्यामुळे कर्णधारांसाठी ते संपत्ती ठरतात. भारताची भूमी पारंपरिक फिरकी गोलंदाजांसाठी प्रसिद्ध. कपिल देव, जवागल श्रीनाथ, झहीर खान यांच्यासारखे बळी घेण्याची क्षमता बाळगणारे वेगवान गोलंदाज अभावानेच पुढे आले. सध्याची फळी आयपीएल क्रांतीमुळे पुढे आली. दहा संघांचा समावेश असलेल्या लीगमधील प्रत्येक संघाला पाच-सहा वेगवान गोलंदाज हवे असतातच. आयपीएलमध्ये यशस्वी होणारा प्रत्येक तरुण वेगवान गोलंदाज भारतीय संघात स्थान मिळवेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव पाडेलच असे नाही; परंतु डेल स्टेन, पॅट कमिन्स आदी खेळाडूंकडून कौशल्ये शिकण्याची संधी, आपसातील तीव्र स्पर्धा यामुळे भारताचा वेगवान मारा अधिक समृद्ध होत आहे.
निवडकर्त्यांकडे उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार या सर्वांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. या सहा जणांत आधी उल्लेख केलेल्या ८-९ तरुणांचा समावेश केल्यास पूर्वी कधीही नव्हता इतका भेदक भारतीय मारा पराक्रम गाजविण्यास सज्ज होऊ शकेल.
मुकेश चौधरी (सीएसके) आणि यश दयाल (गुजरात जायंट्स) हे आणखी दोन लक्षवेधी डावखुरे गोलंदाज. प्रथमच आयपीएल खेळत असताना नियमित बळी घेताना दिसतात. अननुभवीपणाचा डाग पुसून दोघांनी झपाट्याने शिकण्याची वृत्ती दाखविली. उजव्या हाताने गोलंदाजी करणारा कुलदीप सेन (राजस्थान रॉयल्स) डावाच्या सुरुवातीला, मधल्या तसेच डेथ ओव्हरमध्ये अप्रतिम ठरतो.