गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कर्णधार बदलांच्या चर्चांना अखेर खुद्द विराट कोहलीनेच पूर्णविराम दिला. कोहलीने गुरुवारी अपेक्षित निर्णय घेताना टी-२० विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याने केवळ टी-२० क्रिकेटमधील कर्णधारपद सोडण्याचे ठरविले असून एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांत मात्र तो भारताचे नेतृत्त्व करणे कायम ठेवणार आहे.
कोहलीला आपल्या नेतृत्त्वात अद्याप आयसीसीची एकही स्पर्धा जिंकण्यात यश आलेले नाही. त्यामुळेच मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून तो कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात संघाचा एकच कर्णधार असावा की वेगवेगळा कर्णधार असावा, हा विषय कायम वादाचा ठरला आहे.
कोहली गेल्या ४-५ वर्षांपासून भारताच्या तिन्ही संघांचे नेतृत्त्व करत आहे. त्याच्याकडे नेतृत्त्वाचा मोठा अनुभव आहे. पण त्याचवेळी कर्णधार म्हणून असलेल्या मोठ्या जबाबदारीचा परिणाम त्याच्या खेळावरही झाला आहे. त्यामुळेच कोहलीने घेतलेला निर्णय भारतीय क्रिकेटसाठी चांगली गोष्ट असल्याचे मला वाटते. कोहलीनंतर टी-२० क्रिकेटचा कर्णधार म्हणून सहाजिकच रोहित शर्माला पहिली पसंती मिळेल. टी-२० कर्णधार म्हणून रोहितचा रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सने विक्रमी पाचवेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. रोहितला भारताचा कर्णधार बनवण्यासाठी क्रिकेटप्रेमींही अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे आता एक प्रश्न पडतो की, कोहलीने घेतलेला हा निर्णय त्याचा स्वत:चा आहे की, कोणत्या दबावामध्ये त्याला हा निर्णय घ्यावा लागला आहे, याचा विचार करावा लागेल. कदाचित बीसीसीआयमधून कोणीतरी कर्णधार बदलाविषयी सांगितलेही असेल.
कर्णधारपदासाठी रोहित पहिली पसंती असली, तरी त्याला लोकेश राहुल, ऋषभ पंतसारख्या युवा खेळाडूंकडूनही टक्कर मिळू शकते असे म्हटले जात आहे. पण असे होईल वाटत नाही. रोहितला तीन वर्षांसाठी कर्णधारपद मिळाले, तरी खूप मोठी गोष्ट ठरेल. टीम पेन ३५ वर्षांचा आहे, तरी त्याला ऑस्ट्रेलियाने कर्णधार नेमले होते. प्रश्न वयाचा नसून तंदुरुस्तीचा आहे. कर्णधार बनल्यानंतर रोहितला तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल.