संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रभू श्रीरामाच्या मंदिरासाठी देण्यात यावी आणि सुन्नी वक्फ बोर्डाला मशिदीसाठी अयोध्येतच पाच एकर मोक्याची पर्यायी जागा द्यावी, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने एकमताने म्हटलं आहे. या निकालानंतर भारताचा माजी सलामीवर वीरेंद्र सेहवागनं ट्विट केले.
तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयानं शिया वक्फ बोर्डाचा दावा फेटाळला. शिया आणि सुन्नी या दोन समुदायांमध्ये वाद आहे. वादग्रस्त जमीन सुन्नी वक्फ बोर्डची नसून आमची आहे, असा शिया बोर्डचा दावा होता. तो आधी अलाहाबाद उच्च न्यायालयानं फेटाळला होता. त्यामुळे शिया बोर्डनं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानंदेखील त्यांचा दावा फेटाळला. याशिवाय निर्मोही आखाड्याचा दावादेखील न्यायालयानं फेटाळून लावला आहे.
अयोध्या प्रकरणात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे 40 दिवस सुनावणी झाल्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. खास या निकालासाठी न्यायालयानं आजचा दिवस निश्चित केला आहे. या प्रकरणी न्या. रंजन गोगोई यांनी काल उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांशी अयोध्येतील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर सविस्तर चर्चा केली होती. याशिवाय देशभरातील सुरक्षा यंत्रणादेखील सतर्क आहेत.