पाकिस्तान क्रिकेट संघाचा खेळाडू आझम खानने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला घरचा आहेर दिला आहे. आझमने पाकिस्तानच्या संघ व्यवस्थापनला लक्ष्य करत सातत्याने संघातून वगळल्याने टीका केली. २०२१ मध्ये पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण करणाऱ्या आझमने आतापर्यंत केवळ ८ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. अलीकडेच पाकिस्तानी संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता, जिथे आझम खानला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संधी देण्यात आली. पण, पुन्हा एकदा तो राष्ट्रीय संघात साजेशी कामगिरी करू शकला नाही.
पाकिस्तानातील एका यूट्यूब चॅनलवर बोलताना आझम खानने मनातील खदखद बोलून दाखवली. तो म्हणाला की, मागील चार वर्षांमध्ये मी तीनवेळा पाकिस्तानच्या संघात पुनरागमन केले पण मला एकदा देखील संपूर्ण मालिका खेळण्याची संधी मिळाली नाही. हे माझ्यासाठी त्रासदायक असून मी आजही संधीपासून वंचित आहे. मी लीग क्रिकेट खेळतो तेव्हा सर्वांना वाटते की मी मॅचविनिंग खेळी करू शकतो. त्यामुळे मला संघात स्थान दिले जाते. मात्र, संपूर्ण मालिकेत संधी दिली जात नाही तेव्हा माझ्या मनात वेगळा विचार येणे साहजिकच आहे.
आझम खानने व्यक्त केली खदखद तसेच जेव्हा जेव्हा मी परदेशातील प्रशिक्षकांसोबत खेळतो तेव्हा ते मला मी कमजोर असल्याचे सांगत नाहीत. पण, पाकिस्तानी संघात मी येताच मला कमजोर असल्याचे भासवले जाते. मला सातत्याने संघातून वगळले जाते. नुकताच पाकिस्तानी संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता, तिथे पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली गेली. यजमान संघाने ४-१ ने मालिका खिशात घालून एकतर्फी विजय मिळवला.
आगामी काळात क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटचा विश्वचषक पार पडणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत जूनमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक होणार आहे. वन डे विश्वचषकानंतर बाबर आझमच्या राजीनाम्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शान मसूदकडे कसोटी संघाचे नेतृत्व दिले. तर शाहीन आफ्रिदी ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार बनला.