रावळपिंडी : अझहर अली याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथे शतक ठोकले. या बळावर पाकिस्तानने चार गड्यांच्या मोबदल्यात ४७६ धावा उभारून शनिवारी पहिला डाव घोषित केला. अलीने १८५ धावा केल्या मात्र तो दुहेरी शतकापासून वंचित राहिला. ढगाळ वातावरणामुळे ऑस्ट्रेलियाच्या डावात एका षटकाचा खेळ होऊ शकला. ऑस्ट्रेलियाने बिनबाद ५ धावा केल्या.
उस्मान ख्वाजा पाच धावा काढून खेळत असून डेव्हिड वॉर्नरने खाते उघडले नव्हते. पाकने सकाळच्या १ बाद २४५ वरून खेळ सुरू केला. इमाम उल हक याने १५७ धावा ठोकल्या. त्याने अझहर अलीसोबत दुसऱ्या गड्यासाठी २०८ धावांची भागीदारी केली. अझहरने ६४ वरून पुढे खेळताना २५७ चेंडूत शतक गाठले. संपूर्ण डावात त्याने ३६१ चेंडूंवर १५ चौकार आणि तीन षटकारांसह १८५ धावा कुटल्या. कर्णधार बाबर आझमसोबत (३६) त्याने १०१ धावांची भागीदारी केली. मोहम्मद रिझवान २९ आणि इफ्तिखार अहमद १३ धावा काढून नाबाद राहिले.
पाकमध्ये आम्ही सुरक्षितरावळपिंडी : पेशावरच्या मशिदीत झालेल्या बॉम्बहल्ल्यात ५६ लोकांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचे अंतरिम मुख्य कोच ॲन्ड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी आमचा संघ सुरक्षित असल्याचे सांगितले. पहिल्या कसोटीत दिवसाचा खेळ संपल्यानंतर मॅकडोनाल्ड यांनी सुरक्षा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार पुढील दिशा ठरेल, असे स्पष्ट केले. ऑस्ट्रेलिया संघ १९९८ ला येथे आला होता. सध्या संघाला राष्ट्रपतींसारखी सुरक्षा पुरविण्यात आली आहे.