योगेश मिराशी : भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन हे गोवा क्रिकेट संघाचे मेंटर आहेत. त्यांचे गोवा संघाशी जुळणे खेळाडूंनाही प्रेरणादायी ठरत असले तरी त्यांच्या पुत्राची संभाव्य रणजी संघातील निवड ही गोमंतकीयांच्या जिव्हारी लागली. स्थानिक खेळाडूंवर अन्याय झाल्याच्या प्रतिक्रिया उमटत असताना एका गोमंतकीय चाहत्याने चक्क अझरुद्दीननाच सार्वजनिक पत्र लिहिले. हे पत्र शदाब जकातीने फेसबूकवर शेअर केले. या पत्रावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. पत्रात स्थानिक खेळाडूंवर अन्याय नको, अशी विनंतीवजा सूचनाही करण्यात आली आहे. पत्र पुढीलप्रमाणे...
प्रिय, अझरुद्दीन सर...
लहानपणापासून मला तुमचा खेळ व फलंदाजी आवडायची, जेव्हा तुम्ही भारताकडून खेळायचा तेव्हा तुम्हाला फक्त फलंदाजी करताना पाहात राहावे असे वाटायचे. मी स्वत:ला भाग्यवान समजतो; कारण १९९० मध्ये तुम्हाला मडगाव मैदानावर खेळताना पाहण्याची संधी मिळाली. तुम्ही नेहमीच भारतातील व अन्य देशांतील उभरत्या क्रिकेटपटूंसाठी प्रेरणा व आदर्श राहिलात व आहातसुद्धा. भारतीय क्रिकेट इतिहासात एक उत्कृष्ट कर्णधार म्हणून तुमचे नाव घेतले जाते.
पत्र लिहिण्याचे कारण असे की, मला याची कल्पना आहे की ज्युनियर पातळीवर असताना तुम्ही जे परिश्रम घेतले व त्यामुळे तुम्ही हैदराबादच्या रणजी संघात निवडले गेलात. त्यानंतर भारतीय संघात. हेच तुमच्या कष्टाचे फळ. त्यामुळे कष्ट काय असते याची कल्पना तुम्हाला पुरेपूर असेल. सांगण्याचा तात्पर्य म्हणजे, एकादी गोष्ट हवी असल्यास ती कमवावी लागते. तुम्ही गोवा क्रिकेट संघाचे मेंटर म्हणून मोफत सेवा देताय यासारखी अभिमानाची गोष्ट नाही. तुमच्यासारख्यांकडून इतर खेळाडूंना मार्गदर्शन मिळणे हे मोठे भाग्यच; परंतु, माझा प्रश्न इतकाच आहे की, तुमच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार खेळाडू खेळावेत असे तुम्हाला वाटत नाही का? तुमचा मुलगा असादुद्दीन याला गोव्याकडून पदार्पण करायचे आहे; पण गोव्याच्या खेळाडूंना डावलून? हे कितपत योग्य आहे. गोव्याकडे स्वप्नील अस्नोडकर, शदाब जकाती व सौरभ बांदेकर यासारखे उत्तम क्रिकेटपटू आहेत. ज्यांचा रेकॉर्ड उत्तम आहे. हे खेळाडू शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत. मात्र, ते सध्या फिट नसल्याचे सांगून त्यांना संघातून डावलले गेले. हे सर्वकाही तुमचा मुलगा व अन्य काही व्यावसायिक खेळाडूंसाठी. स्वप्नील, जकाती व सौरभ हे शारीरिक चाचणीमधून गेलेले नाहीत, तरीही त्यांना अपात्र घोषित करण्यात आले? हे योग्य आहे का?
तुम्ही जेव्हा खेळत होता, तेव्हा लयमध्ये असताना कधीतरी तुम्हाला संघातून डावलले गेले असेलच? त्या वेळी तुम्हाला असोसिएशन व बोर्डबद्दल काय वाटले होते, ते तुम्ही सांगावे.
गोव्याचा एक क्रिकेट चाहता असल्याने दुसऱ्या खेळाडंूसाठी स्थानिक खेळाडूला ठोस कारणाशिवाय डावलले गेले, याबद्दल मला वाईट वाटेलच. आता त्यांना अशा प्रसंगातून जावे लागते. तुम्हाला गोव्याचे दरवाजे खुले असून तुम्ही गोवा संघाचे मेंटर म्हणून काम करा; पण गोव्याच्या प्रतिभावन खेळाडूंकडे दुर्लक्ष होऊ नये... इतकेच.
तुमचा,
सुमीत नाईक
Web Title: Azharuddin letter of the fiancée!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.