Join us

सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीला मिळाली कलाटणी; अझरुद्दीननं सांगितली पडद्यामागची गोष्ट

27 मार्च 1994 साली सचिननं आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये सर्वप्रथम ओपनिंग केली होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 14:21 IST

Open in App

सचिन तेंडुलकर... मुंबईला, देशाला, जगाला मिळालेला एक महान फलंदाज. वन डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा, सर्वाधिक शतकांचा विक्रम नावावर असलेल्या या खेळाडूसाठी आजचा दिवस खुप खास आहे. त्याच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं आजच्याच दिवशी कलाटणी मिळाली होती. 27 मार्च 1994 साली सचिननं आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये सर्वप्रथम ओपनिंग केली होती आणि त्यानंतर त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. त्यानंतर सचिन हा जगातील सर्वात यशस्वी सलामीवीर म्हणून ओळखला जाऊ लागला. पण, सचिनला ही संधी देण्यापूर्वी पडद्यामागे एक गोष्ट घडली होती आणि तत्कालीन कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यानं तो किस्सा सांगितला. 

न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेतील तो दुसरा सामना होता. त्या सामन्यात कर्णधार अझरुद्दीन आणि संघाचे व्यवस्थापक अजित वाडेकर यांनी सचिनला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्या संधीचं सोनं करताना सचिननं 49 चेंडूंत 15 चौकार व 2 षटकार खेचून 82 धावांची खेळी करून टीम इंडियाला मालिकेत 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली होती. न्यूझीलंडचा डाव 142 धावांत गुंडाळल्यानंतर टीम इंडियानं 23.2 षटकांत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले.  

सचिनला ही संधी का दिली हे अझरुद्दीननं सांगितलं... 

''सचिन तेंडुलकरला आम्ही 5-6व्या क्रमांकावर खेळवले, परंतु त्याला मोठी खेळी करता आलेली नाही. त्यानंतर मी आणि वाडेकर सर यांनी चर्चा केली आणि सचिनला सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला. तेव्हाच संघाचा नियमित सलामीवीर नवज्योत सिंग सिद्धू आजारी पडला होता,'' असे अझरुद्दीननं सांगितले. 

तो पुढे म्हणाला,''त्यानंतर जे घडले याचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. तो जगातील सर्वोत्तम फलंदाज बनला याचा आनंद आहे. सचिनमध्ये ठासून गुणवत्ता भरली आहे, हे मला माहीत होतं. त्याला केवळ त्या संधीची आवश्यकता होती. सचिन आक्रमक फलंदाज होता आणि त्यावेळी क्षेत्ररक्षणाच्या नियमामुळे सुरुवातीला आक्रमक फलंदाजी करणे गरजेचे होते. त्याचा यशाचं श्रेय मला घ्यायचं नाही. कोणीही ते घेऊ शकत नाही.''   

टॅग्स :सचिन तेंडुलकरनवज्योतसिंग सिद्धू