शारजाह : कोलकाताविरुद्ध पंजाबने आठ गडी राखून विजय मिळवला. त्यात सलामीला आलेल्या मनदीपसिंग याची नाबाद ६६धावांची खेळी विशेष ठरली. विजयानंतर मनदीपवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मनदीपने अर्धशतक झाल्यानंतर आभाळाकडे पाहत ही खेळी वडिलांना समर्पित केली. या खेळीबद्दल बोलताना मनदीपने खुलासा केला.तो म्हणाला, ‘ही खेळी माझ्यासाठी फारच खास आहे. माझे बाबा मला प्रत्येक सामन्यात नाबाद राहण्यासंदर्भात सल्ला द्यायचे. त्यामुळे ही खेळी खरोखरच माझ्यासाठी विशेष आहे. ते अनेकदा मला सांगायचे १०० असो किंवा २०० धावसंख्या असो तू नाबाद राहायला हवे. सामन्याआधी मी राहुलबरोबर संवाद साधला होता. मागील सामन्यात मी वेगाने धावा करण्याच्या नादात बाद झालो. मी माझा नॉर्मल गेम खेळलो तर मी सामना जिंकून देऊ शकतो, यावर माझा विश्वास आहे असे राहुलला सांगितले. त्यावर राहुलने मला योग्य वाटेल त्या पद्धतीने खेळण्याचा सल्ला दिला होता. विजयामुळे पंजाबचे स्पर्धेतील आव्हान कायम राहण्यासाठी मोठा फायदा झाला आहे. पंजाबला हा विजय मिळवून देण्यात मनदीपसिंग आणि ख्रिस गेल यांची भागीदारी महत्त्वाची ठरली. गेलने तुफानी खेळी करत ५१ धावांचा पाऊस पाडला. शुक्रवारी रात्री मनदीपच्या वडिलांचे निधन झाले. आयपीएलला निघण्याआधीच मनदीपच्या वडिलांची प्रकृती ठीक नव्हती. याच आजारपणामुळे त्यांचे २३ ऑक्टोबर रोजी निधन झाले. तरी मनदीप दुसऱ्याच दिवशी सर्व धैर्य दाखवून हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मैदानात उतरला. मनदीप या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. १४ चेंडूत १७ धावा करत मनदीप बाद झाला. शनिवारचा विजय पंजाबच्या संघाने मनदीपच्या वडिलांना समर्पित केला. तर सोमवारी मनदीपने अर्धशतक झाल्यानंतर वडिलांना अभिवादन केले. पंजाबला कर्णधार लोकेश राहुल यानेही ड्रिंक्स ब्रेकदरम्यान मैदानात धाव घेत मनदीपला मिठी मारत त्याचे अभिनंदन केले.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- "बाबा नाबाद राहण्याचा सल्ला द्यायचे, ही विशेष खेळी दिवंगत वडिलांना समर्पित" - मनदीपसिंग
"बाबा नाबाद राहण्याचा सल्ला द्यायचे, ही विशेष खेळी दिवंगत वडिलांना समर्पित" - मनदीपसिंग
IPL 2020 News : ही खेळी माझ्यासाठी फारच खास आहे. माझे बाबा मला प्रत्येक सामन्यात नाबाद राहण्यासंदर्भात सल्ला द्यायचे. त्यामुळे ही खेळी खरोखरच माझ्यासाठी विशेष आहे. ते अनेकदा मला सांगायचे १०० असो किंवा २०० धावसंख्या असो तू नाबाद राहायला हवे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 4:12 AM