pak vs afg । नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी पाकिस्तानने आपला 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. भारताच्या पावलावर पाऊल ठेवत पाकिस्तानने देखील आपल्या अनुभवी खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संधी दिली आहे. आगामी वन डे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने ट्वेंटी-20 संघात मोठा बदल केला आहे. या मालिकेसाठी नियमित कर्णधार बाबर आझमला विश्रांती देण्यात आली असून त्याच्या जागी शादाब खान संघाचे नेतृत्व करणार आहे. या मालिकेत बाबरशिवाय मोहम्मद रिझवान, शाहीन आफ्रिदी, फखर जमान आणि हारिस रौफ यांना विश्रांती देण्यात आली आहे.
दरम्यान, पाकिस्तानी संघात इमाद वसीमचे पुनरागमन झाले आहे. तसेच सैम अयुब, एहसानुल्लाह, तय्यब ताहिर, आझम खान, जमान खान यांना संघात संधी मिळाली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका 25 मार्चपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील दुसरा ट्वेंटी-20 सामना 27 मार्चला आणि तिसरा अर्थात अखेरचा सामना 29 मार्चला खेळवला जाईल. सर्व सामने शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील.
अफगाणिस्तानविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी पाकिस्तानी संघ - शादाब खान (कर्णधार, अब्दुल्ला शफीक, आझम खान, फहीम अश्रफ, इफ्तिखार अहमद, इहसानुल्ला, इमाद वसीम, मोहम्मद हरिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, सैम अयुब, शान मसूद, तय्यब ताहिर, झमान खान.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"