भारतात सध्या इंडियन प्रीमिअर लीग २०२३ सुरू आहे. पाचवेळच्या मुंबई इंडियन्सने ११ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सला नमवून यंदाच्या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद केली. कर्णधार रोहित शर्माला त्या सामन्यात फॉर्म परतला आणि उद्या घरच्या मैदानावर MI कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करणार आहे. इथे रोहित शर्मा आयपीएल २०२३ मध्ये व्यग्र असताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाची नोंद केली. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० सामन्यात बाबरने खणखणीत शतक झळकावले आणि त्याने हिटमॅनच्या नावावर कर्णधार म्हणून असलेला मोठा विक्रम मोडला. जगात असा विक्रम करणारा तो एकमेव कर्णधार ठरला आहे.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ४ बाद १९२ धावांचा डोंगर उभा केला. बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान या जोडीने पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. रिझवान ३४ चेंडूंत ५० धावांवर बाद झाला. त्यानंतर पाकिस्तानची मधली फळी अपयशी ठरली. पण, बाबर एका बाजूने लढला आणि त्याने ५८ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद १०१ धावा केल्या. इफ्तिकार अहमदने १९ चेंडूंत ३३ धावांची नाबाद खेळी केली.
न्यूझीलंडविरुद्ध ट्वेंटी-२०त शतक झळकावणारा तो पहिला पाकिस्तानी खेळाडू आहे. यापूर्वी २०२० मध्ये मोहम्मद हाफीजने नाबाद ९९ धावा केल्या होत्या. घरच्या मैदानावरील कर्णधार म्हणून बाबरचे ट्वेंटी-२०तील हे दुसरे शतक ठरले आणि य़ाबाबतीत त्याने रोहित शर्माशी बरोबरी केली. जगभरातील फलंदाजांमध्ये ख्रिस गेल ( २२) याच्यानंतर बाबर आजमचा ( ९) सर्वाधिक ट्वेंटी-२० शतकांमध्ये क्रमांक येतो. बाबरचे हे आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०तील तिसरे शतक ठरले. त्याने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि आज न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी केली आणि आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त तीन शतकं नावावर असलेला तो जगातील एकमेव कर्णधार ठरला आहे. त्याने रोहित शर्मा ( २) व मेग लॅनिंग ( २) यांचा विक्रम मोडला.
Web Title: Babar Azam becomes the first captain to score three T20I centuries, break Rohit Sharma big Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.