पाकिस्तानच्या वनडे आणि टी-२० संघाचा कॅप्टन बाबर आझम सध्या एका एका धावेसाठी संघर्ष करताना दिसतोय. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याला फक्त ६४ धावा करता आल्या. चार डावातील एका डावात त्याच्या पदरी भोपळाही पडला. याआधी टी२० वर्ल्ड कप स्पर्धेतही त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नव्हता.
आता क्लब बॉलरनं केला 'इज्जतीचा फालुदा'
सातत्याने पदरी येणाऱ्या अपयशामुळे बाबर आझमवर टीका होत आहे. एका बाजूला त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात असून तो संघाबाहेर फेकला जाईल, असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात आता क्लब बॉलरनंही त्याच्या 'इज्जतीचा फालुदा' केला आहे.
पॅडल स्वीपचा प्रयत्न फसला, बाबर आझमचा क्लब बॉलरनं उडवला त्रिफळा
पाकिस्तानमध्ये देशांतर्गत वनडे चॅम्पियन्स कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत पाकिस्तानचे सर्वच प्रमुख खेळाडू भाग घेणार आहेत. यात बाबर आझमच्या नावाचाही समावेश आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधी बाबर आझम सराव सामन्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. पण या सामन्यातही तो अपयशी ठरला. क्लबच्या एका बॉलरनं त्याला त्रिफळाचित केलं. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या फिरकीपटूला पॅडल स्वीप मारण्याच्या नादात बाबर आझम बाद झाला.
बाबर आझमनं २० चेंडूत केल्या २० धावा
बाबर आझमनं या सराव सामन्यात २० चेंडूंचा सामना करताना २० धावा केल्या. पाकिस्तानमधील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत तो स्टालियन्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. पाकिस्तान वनडे आणि टी-२० संघाचा कॅप्टन असूनही या स्पर्धेत बाबरला कॅप्टन्सीची जबाबदारी मिळालेली नाही. तो युवा विकेटकीपर बॅटर मोहम्मद हॅरिसच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल. त्यामुळे आगामी काळात त्याला वनडे आणि टी-२० कॅप्टन्सी गमावण्याची वेळ येऊ शकते, अशी चर्चा पाकिस्तानी मीडियामध्ये सुरु आहे.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटीसाठी संघात स्थान मिळणार?
पाकिस्तानचा संघ आगामी मालिका इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे. ऑक्टोबरमध्ये तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहे हे सामने मुल्तान, कराची आणि रावळपिंडी येथील मैदानात नियोजित असले तरी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हे कसोटी सामने श्रीलंका किंवा युएईमध्ये स्थलांतरित करण्याचा विचार करत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये कमबॅक करत बाबर इंग्लंड विरुद्धच्या कसोटीसाठी संघात स्थान मिळवणार का? ते पाहण्याजोगे असेल.