मुंबई: टी-२० विश्वचषक स्पर्धा २०२१ च्या पहिल्याच सामन्यात पाकिस्ताननं भारताचा दारुण पराभव केला. भारताला १० गडी राखून पराभूत करत पाकिस्ताननं इतिहास रचला. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं पहिल्यांदाच भारताला पराभूत केलं. या सामन्यानंतर भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्यात संवाद झाला. दोन्ही कर्णधार एकमेकांशी बोलत असताना काढण्यात आलेल्या फोटोची बरीच चर्चा झाली.
भारत-पाकिस्तान सामन्यानंतर कोहलीसोबत नेमका काय संवाद झाला याबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. त्याबद्दल बाबर आझमला पत्रकारानं प्रश्न विचारला. विराटसोबत नेमकं काय बोलणं झालं, असा सवाल आझमला विचारण्यात आला. त्यावर आमच्यात जो संवाद झाला, तो मी कोणासमोर सांगू इच्छित नाही, असं उत्तर आझमनं दिलं.
विराट कोहलीनं टी-२० संघाचं नेतृत्त्व सोडलं आहे. एकदिवसीय संघाची धुरा त्याच्याकडून काढून घेण्यात आली आहे. याबद्दल आझमला पाकिस्तानी पत्रकारानं प्रतिक्रिया विचारली. पाकिस्तानी संघाच्या माध्यम व्यवस्थापकांनी आझमला या प्रश्नाचं उत्तर देऊ दिलं नाही. ही पत्रकार परिषद केवळ वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसंदर्भात असल्याचं व्यवस्थापक म्हणाले.
टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अतिशय खराब झाली. पहिल्याच सामन्यात पाकिस्ताननं १० गडी राखून भारताचा धुव्वा उडावला. भारतानं दिलेलं १५२ धावांचं आव्हान पाकिस्ताननं लिलया पेललं. त्यानंतर न्यूझीलंडनं भारताला पराभूत केलं. यानंतरचे तीन सामने भारतानं जिंकले. मात्र भारताला उपांत्य फेरी गाठता आली नाही. पाकिस्ताननं मात्र मोठ्या दिमाखात उपांत्य फेरी गाठली.