Join us  

बाबर आझम फक्त मित्रांनाच संघात संधी देतो, पाकिस्तानच्या कर्णधारावर खळबळजनक आरोप!

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध दारुण पराभव पत्करलेल्या पाकिस्तान संघावर आता प्रश्नांचा भडीमार केला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 2:36 PM

Open in App

आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध दारुण पराभव पत्करलेल्या पाकिस्तान संघावर आता प्रश्नांचा भडीमार केला जात आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने तर बाबर आझमच्या संघ निवडीबाबतच खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. पाकिस्तानने असे सर्व खेळाडू एकत्र केलेत की जे एकत्र खेळून प्रगती करुच शकणार नाहीत आणि त्यांच्यात सुधारणा करण्यास फार कमी वाव आहे, असं सलमान बट यानं म्हटलं आहे. इतकंच नव्हे, तर भारतीय पत्रकाराशी गैरवर्तन करणाऱ्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा यांच्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. केवळ मैत्रीच्या जोरावर पाकिस्तानच्या संघात खेळाडूंना स्थान दिलं जात का? असा सवाल उपस्थित करत सलमान बटने थेट बाबर आझमवर निशाणा साधला आहे. 

पाकिस्तानी यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सलमान बटनं धक्कादायक खुलासे केले. "संघात युवा खेळाडू नक्कीच असायला हवेत पण अनुभवी खेळाडूंनाही स्थान द्यायला हवं. युवा खेळाडू आपल्याच वयोगटातील खेळाडूंसोबत खेळून परिपक्व होणार नाहीत. त्यांना अनुभवी खेळाडूंची साथ मिळणं गरजेचं आहे. पण यांनी सर्व एकसारखे खेळाडू संघात निवडले आहेत. जेव्हा सर्वच नवखे खेळाडू एकत्र खेळले की त्यांच्यात सुधारणेला फार कमी वाव अतो. व्यक्तीमध्ये सुधारणा तेव्हाच होते जेव्हा त्याच्यापेक्षा चांगलं काहीतरी समोर दिसतं", असं सलमान बट म्हणाला. 

सलमान बटने शोएब मलिकला पाकिस्तानी संघाच्या मैत्रीबद्दल खुलेपणाने बोलण्याचा सल्लाही दिला. ''शोएब मलिकने नुकतंच म्हटलं होतं की पाकिस्तानच्या संघात मैत्री-दोस्ती पाळली जाते. मग मलिकनं खुलेपणानं बोलावं की तो कोणत्या खेळाडूबद्दल बोलत आहे", असं सलमान बट म्हणाला. आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर शोएब मलिकनं एक ट्विट केलं होतं. 'आम्ही मैत्री आणि पसंती-नापसंतीच्या संस्कृतीतून कधी बाहेर पडू? अल्लाह नेहमी प्रामाणिक लोकांना मदत करतो', असं ट्विट मलिकनं केलं होतं. 

आशिया चषकात पाकिस्तानची फलंदाजी अत्यंत खराब झाली होती. बाबर आझम फ्लॉप ठरला आणि रिझवानने धावा केल्या पण त्याचा स्ट्राईक रेट संघासाठी चिंतेचा विषय ठरला. तसेच मधली फळीही खूपच कमकुवत दिसून आली. त्यामुळे पाकिस्तानी संघावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

टॅग्स :बाबर आजमएशिया कप 2022
Open in App