नवी दिल्ली : पाकिस्तान आणि इंग्लंड (PSK vs ENG) यांच्यात झालेल्या टी-20 मालिकेत पाकिस्तानचा दारूण पराभव झाला आहे. 7 सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना जिंकून इंग्लिश संघाने पाकिस्तानच्या धरतीवर इतिहास रचला आहे. तब्बल 17 वर्षांनंतर इंग्लंडच्या संघाने पाकिस्तानच्या धरतीवर मालिका खेळली. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सोडलेला झेल पाकिस्तानच्या पराभवास कारणीभूत असल्याचे पाकिस्तानच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. सातव्या सामन्यांपूर्वी मालिका 3-3 अशा बरोबरीत होती. त्यामुळे अखेरचा सातवा सामना निर्णायक सामना ठरला.
दरम्यान, रविवारी झालेल्या अखेरच्या सामन्यात बाबर आझम केवळ 4 धावा करून बाद झाला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लिश संघाने 210 धावांचा डोंगर उभारला होता, ज्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ अयशस्वी ठरला. इंग्लंडने 67 धावांनी मोठा विजय मिळवून 4-3 ने मालिका खिशात घातली. या सामन्यात बाबर आझमने देखील एक झेल सोडला त्यामुळे चाहते त्याच्यावर खूप निराश झाले आहेत.
इंग्लंडची शानदार खेळी प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात काही चांगली झाली नव्हती. फिल सॉल्ट (20) व ॲलेक्स हेल्स (19) हे सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. कर्णधार बाबरने दोन सोपे झेल टाकल्याने पाकिस्तानसमोर अडचण निर्माण झाली. डेव्हिड मलान व बेन डकेट यांनी इंग्लंडला सामन्यात कमबॅक करून दिले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. डकेट 19 चेंडूंत 3 चौकार व 1 षटकार मारून 30 धावांवर रन आऊट झाला. त्यानंतर आलेल्या हॅरी ब्रुकने चौथ्या विकेटसाठी मलानसह 108 धावा चोपल्या. मलानने 47 चेंडूंत 8 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 78 धावा केल्या, तर ब्रुकने 29 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकारासह नाबाद 46 धावा कुटल्या. इंग्लंडने 3 बाद 209 धावांचा डोंगर उभा केला.
पाकिस्तानचा दारूण पराभव इंग्लंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून निराशाजनक सुरूवात झाली. मोहम्मद रिझवान (1), कर्णधार बाबर (4) व इफ्तिकार अहमद (19) माघारी परतल्याने पाकिस्तानची अवस्था 3 बाद 33 झाली होती. शान मसूद व खुशदिल शाह यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना केला. आदिल राशिदने ही जोडी तोडतानान शाहला 27 धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी तंबूत परतण्याची लाईनच लावली. शान मसूदने 43 चेंडूंत 4 चौकार व 1 षटकार खेचून 56 धावांची एकाकी झुंज दिली. पाकिस्तानला 20 षटकांत 8 बाद 142 धावा करता आल्या.