Babar Azam Troll, Arshad Nadeem: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ( Paris Olympics 2024 ) पाकिस्तानच्या अर्शद नदीमने भालाफेकच्या अंतिम फेरीत नवा विक्रम रचला आणि सुवर्णपदक जिंकण्यात यश मिळविले. अर्शद नदीमचा हा विजय संपूर्ण पाकिस्तानसाठी खास होता. या मोठ्या कामगिरीबद्दल सर्वजण त्याचे अभिनंदन करत आहेत. या यादीत पाकिस्तान ( Pakistan Cricket) क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमचाही समावेश आहे. बाबर आझमने अर्शद नदीमचे सोशल मीडियावर अभिनंदन केले. पण अभिनंदनाचे ट्विट करताना त्याने एक मोठी चूक केली, ज्यामुळे तो ट्रोल झाला.
अर्शद नदीमचं ट्विट करत केलं अभिनंदन
अर्शद नदीमने भालाफेकच्या अंतिम फेरीत ९२.९७ मीटर फेक केली. हा एक नवीन ऑलिम्पिक विक्रम बनला. अर्शदने सुवर्णपदक जिंकताच बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानसह अनेक खेळाडूंनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्य. मात्र यादरम्यान बाबरने केलेली चूक चर्चेत आली. बाबर आझमने लिहिले, "पाकिस्तानमध्ये ३० वर्षांनंतर सुवर्णपदक परतले आहे. या दमदार कामगिरीबद्दल अर्शद नदीमचे खूप खूप अभिनंदन. तू संपूर्ण देशाचा गौरव आहेस."
बाबरची चूक काय घडली?
पाकिस्तानने शेवटचे सुवर्णपदक १९८४ मध्ये जिंकले होते. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मिळालेले सुवर्णपदक हे पाकिस्तानचे ३० नव्हे तर ४० वर्षांनंतरचे गोल्ड मेडल आहे. याशिवाय तब्बल ३२ वर्षांनंतर पाकिस्तानने ऑलिम्पिक पदक जिंकले आहे. तसेच बाबरने आणखी एक चूक केली. त्याने आपल्या ट्विटमध्ये अर्शद नदीमला चुकीच्या पद्धतीने टॅग केले. या दोन चुकांमुळे त्याला सोशल मीडियावर भरपूर ट्रोल केले जात आहे.
दरम्यान, बाबर आझमला त्याच्या अशा चुकांमुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेकदा त्याने अशा विचित्र चुका केल्या आहेत.