नवी दिल्ली : पाकिस्तानचा संघ सध्या नेदरलॅंड (PAK vs NED) दौऱ्यावर असून तिथे एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या संघाने विजय मिळवला पण त्यासाठी त्यांना मोठा संघर्षही करावा लागला. नेदरलॅंडच्या संघाने देखील झुंज देत पाकिस्तानला चांगलीच टक्कर दिली. पाकिस्तानकडून फखर जमानने (Fakhar Zaman) शतकी खेळी करून मोलाची भूमिका पार पाडली. त्याने केलेल्या १०९ चेंडूत १०९ धावांच्या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने नेदरलॅंडसमोर ३१४ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील १४ वे अर्धशतक झळकावून इतिहास रचला.
बाबर आझमने दिग्गजांना टाकले मागेबाबर आझम ८८ एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत बाबरच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४,५१६ धावांची नोंद असून तो अव्वल स्थानावर विराजमान आहे. ही खेळी करून बाबरने पुन्हा एकदा आमला, कोहली आणि विवियन रिचर्ड्स यांचा विक्रम मोडला आहे.
८८ एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ४,४७३ धावांसह हाशिम आमलाचा नंबर लागतो. या यादीत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर विवियन रिचर्ड्स आणि शाई होप यांची नावे आहेत. तसेच भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ८८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३,८८६ धावा करून पाचव्या स्थानावर आहे. म्हणजेच बाबर आझमने पुन्हा एकदा ४ खेळाडूंना मागे टाकले आहे.
८८ डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
- ४,५१६ - बाबर आझम - पाकिस्तान
- ४,४७३ - हाशिम आमला - दक्षिण आफ्रिका
- ४,०३८ - विवियन रिचर्ड्स - वेस्टइंडिज
- ४,०२६ - शाई होप - वेस्टइंडिज
- ३,८८६ - विराट कोहली - भारत