Babar Azam Virat Kohli: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात इतिहास रचला असून एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली. बाबरने असा विक्रम केला आहे, जो आतापर्यंत कोणताही पाकिस्तानी क्रिकेटर करू शकलेला नाही. बाबर आझम हा माजी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि सध्याचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या खास क्लबमध्ये सामील झाला. त्याने आपल्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. अशाप्रकारे टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3,000 धावा करणारा बाबर पहिला पाकिस्तानी क्रिकेटर ठरला आहे.
विराटच्या विक्रमाशी बाबरची बरोबरी
बाबर आझमने टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८१ व्या डावात ३ हजार धावांचा टप्पा ओलांडला. अशाप्रकारे या फॉरमॅटमध्ये सर्वात जलद ३ हजार धावा करण्याच्या बाबतीत बाबरने विराट कोहलीची बरोबरी केली. विराट कोहलीने देखील ८१ डावांमध्ये ही कामगिरी केली होती. त्यामुळे आता विराट आणि बाबर संयुक्तपणे अव्वल स्थानावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल असून त्याने १०१ डावांत ३ हजारांचा टप्पा गाठला होता.
आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात जलद ३,००० धावा करणारे खेळाडू-
विराट कोहली - ८१ डाव
बाबर आझम - ८१ डाव
मार्टिन गप्टिल - १०१ डाव
रोहित शर्मा - १०८ डाव
पॉल स्टर्लिंग - ११३ डाव
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात बाबर चमकला, पण...
बाबरने इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सहाव्या टी२० सामन्यात ही कामगिरी केली आहे. सध्या पाकिस्तानचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध ७ टी२० सामन्यांची मालिका खेळत आहे. त्याचे आतापर्यंत ६ सामने झाले असून मालिका ३-३ अशी बरोबरीत आहे. शुक्रवारी सहावा सामना खेळला गेला, ज्यात इंग्लंड संघाने ८ विकेट्सने विजय मिळवला. याच सामन्यात बाबर आझमने ५९ चेंडूत नाबाद ८७ धावा केल्या. या दरम्यान त्याने ३ षटकार आणि ७ चौकार लगावले. या डावात बाबर आझमचा स्ट्राईक रेट १४७.४६ होता. मात्र, तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
Web Title: Babar Azam joins elusive list of T20I batters as he equals Virat Kohli record of 3000 runs beats Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.