Babar Azam Eng Vs Pak T20 : T20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडनेपाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. अंतिम सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने सामन्यात घडलेली एक घटना या पराभवासाठी जबाबदार असल्याचे म्हटले. तसंच असे घडले नसते तर सामन्याचा निकाल वेगळा असता असे मत त्याने व्यक्त केले.
सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला दुखापत झाली नसती तर निकाल वेगळा असू शकला असता. हॅरी ब्रूक्सचा झेल घेताना आफ्रिदीला दुखापत झाली. त्यानंतर 16 व्या षटकात तो गोलंदाजीवर आला पण तो फक्त एक चेंडू टाकू शकला आणि त्यानंतर ऑफस्पिनर इफ्तिखार अहमदने हे षटक पूर्ण केले. त्यामुळे पाकिस्तानचा गोलंदाजीचा समतोल बिघडला, असे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने इंग्लंडविरुद्धच्या T20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर सांगितले.
…तर गोष्टी निराळ्या असत्याजर शाहीनने ओव्हर केली असती तर गोष्टी निराळ्या असत्या. तेव्हा स्टोक्स आणि मोईन अली क्रिजवर होते आणि यासाठी मी ऑफस्पिनरला चेंडू दिला. आम्ही चांगल्या पार्टनरशिप्स करू शकलो नाही म्हणून आम्ही बॅकफुटवर गेलो. इंग्लंडच्या गोलंदाजांनीही उत्तम गोलंदाजी केली. आम्ही परिस्थितीनुरुप खेळ खेळलो परंतु 20 व्या षटकापर्यंत आमच्यावर दबाव होता. जर शाहीन असता तर परिस्थिती कदाचित वेगळी असती, असेही त्याने नमूद केले.
शाहीन शाह आफ्रिदी मैदानाबाहेर गेला तेव्हा इंग्लंड संघाला 4.5 षटकात 41 धावांची गरज होती. पण शाहीनचे षटक पूर्ण करण्यासाठी आलेल्या इफ्तिखार अहमदने 13 धावा दिल्या ज्यात बेन स्टोक्सच्या षटकार आणि चौकारांचा समावेश होता. त्यामुळे इंग्लंडवरील दबाव कमी झाला. बेन स्टोक्सने एक षटक शिल्लक असताना सामना संपवला आणि इंग्लंडला दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचा चॅम्पियन बनवले.