दुबई : मागील तीन कसोटी सामन्यांत 92, 62, 13 धावा करणाऱ्या बाबर आझमने अखेरीस कसोटीतील पहिले शतक पूर्ण केले. बाबरने नाबाद 127 धावांची खेळी करताना न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानला मोठी धावसंख्या गाठून दिली. 2018 मध्ये खेळलेल्या दहा डावांमध्ये त्याने पाचव्यांदा पन्नासाहून अधिक धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी ही जवळपास 68 इतकी होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर पाकिस्तानने पहिला डाव 5 बाद 418 धावांवर घोषित केला. बाबरने या खेळीसह भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे.
दोन वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत बाबरचा आपली छाप पाडता आलेली नाही. मागील दोन वर्षांत त्याला दोनवेळाच पन्नासाहून अधिक धावा करता आल्या, मात्र रविवारी 24 वर्षीय बाबरने कसोटीतील पहिले शतक पूर्ण केले. पहिल्या दिवशी पाकिस्तानचे चार फलंदाज 207 धावांवर माघारी परतले. त्यानंतर हॅरीस सोहेल आणि बाबर यांनी पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारून दिली. हॅरीसने 147 धावा केल्या, तर बाबर 127 धावांवर नाबाद राहिला.
बाबरने 2018 मध्ये 10 डावांत 67.71च्या सरासरीने 474 धावा केल्या आहेत. याउलट कोहलीने 18 डावांत 59.05 च्या सरासरीने 1063 धावा केल्या आहेत. बाबरने सरासरीच्या बाबतीत कोहलीला मागे टाकले आहे.