मॅन्चेस्टर : पाकिस्तानचा बाबर आझम विराट कोहली आणि केन विलियम्सन यांच्या तोडीचा असून सध्याच्या क्रिकेटमध्ये ‘फॅब फोर’ ऐवजी ‘फॅब फाईव्ह’ असा विचार करावा लागेल,’ असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसैन याने व्यक्त केले. सध्याच्या आधुनिक क्रिकेटविश्वात ‘फॅब फोर’मध्ये कोहली आणि विलियम्सन यांच्यासह आॅस्टेÑलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांचा समावेश आहे.
हुसैनने म्हटले की, ‘क्रिकेटविश्वात नेहमीच कोहली, स्मिथ, विलियम्सन आणि रुट यांचा समावेश असलेल्या ‘फॅब फोर’ची चर्चा होत असते. मात्र आता यामध्ये बाबर आझमचाही समावेश करुन ‘फॅब फाईव्ह’ची चर्चा करावी लागेल.’ गेल्या काही वर्षांत पाकिस्तानचा सर्वोत्तम फलंदाज ठरलेल्या आझमने सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ६९ धावा केल्या. हुसैन पुढे म्हणाला की, ‘गेली कित्येक वर्षे पाकिस्तान आपल्या घरापासून दूर यूएईमध्ये खेळत आहे. तिथे त्यांच्या खेळाडूंना पाहण्यास कुणीही नाही. पाकिस्तान भारतीय क्रिकेटच्या सावलीत लपले गेले असून त्यातून ते वर आले नाही. त्यांना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही, असेच भारतातही खेळायला मिळत नाही.’ त्याचप्रमाणे, ‘जर तो विराट कोहली असता, तर सर्वांनी त्याची चर्चा केली असती, मात्र तो बाबर आझम आहे आणि त्यामुळेच, त्याच्याविषयी चर्चा होताना दिसत नाही,’ असेही हुसैन याने म्हटले.