PAK vs ENG, Babar Azam: "प्रमुख गोलंदाज बाहेर होते...", इंग्लंडविरूद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर बाबर आझमने सांगितलं कारण

तब्बल 17 वर्षानंतर पाकिस्तानच्या धरतीवर कसोटी मालिका खेळून इंग्लिश संघाने इतिहास रचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 01:18 PM2022-12-20T13:18:15+5:302022-12-20T13:18:41+5:30

whatsapp join usJoin us
Babar Azam reacts after Ben Stokes-led England whitewash Pakistan in Test series  | PAK vs ENG, Babar Azam: "प्रमुख गोलंदाज बाहेर होते...", इंग्लंडविरूद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर बाबर आझमने सांगितलं कारण

PAK vs ENG, Babar Azam: "प्रमुख गोलंदाज बाहेर होते...", इंग्लंडविरूद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर बाबर आझमने सांगितलं कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : तब्बल 17 वर्षानंतर पाकिस्तानच्या धरतीवर कसोटी मालिका खेळून इंग्लिश संघाने इतिहास रचला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वात इंग्लंडच्या संघाने यजमान संघाला त्यांच्याच घरात कसोटी मालिकेत 'वाईट' वॉश दिला. 3 सामन्यांच्या मालिकेतील तिन्ही सामने जिंकून इंग्लिश संघाने विजयरथ कायम ठेवला आहे. खरं तर पाकिस्तानी संघ या मालिकेतील पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. इंग्लंडने तिसऱ्या कसोटीतही पाकिस्तानला घरच्या प्रेक्षकांसमोर नाक घासायला लावले. पहिल्या दोन कसोटींत सपाटून मार खाल्यानंतर पाकिस्तान कराचीत संघर्ष करेल असे वाटले होते. पण, इंग्लंडच्या 18 वर्षाच्या रेहान अहमदने त्यांची कोंडी केली. पाकिस्तानी वंशाच्या रेहानने बाबर आजम अँड टीमला इंगा दाखवला. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी मोहीम फत्ते केली आणि तिसरी कसोटी 8 विकेट्स राखून जिंकली. 

दरम्यान, लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. "या पराभवामुळे आम्ही नाराज आहोत पण इंग्लंडच्या संघाने शानदार खेळी केली त्यामुळे त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. आमच्या संघातील काही खेळाडू फिट नव्हते, नव्या खेळाडूंना संधी मिळाली मात्र विजय मिळाला नाही. तसेच आमची फलंदाजी चांगली होती मात्र गोलंदाजीतील चुकांमुळे पराभवाला सामोरे जावे लागले", असे बाबर आझमने म्हटले. 

पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव 
खरं तर बाबर आझमने पराभवाची जबादारी स्वीकारली पण प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे पराभव झाला असल्याचेही त्याने म्हटले. "आमची मजबूत बाजू म्हणजे फलंदाजी होती. शाहिन आफ्रिदी, हारिस रौफ आणि हसनैन हे दुखापतीमुळे खेळू शकले नाहीत. नवीन खेळाडूंनी प्रयत्न केला मात्र फारसे यश आले नाही. आम्ही चांगली फलंदाजी केली मात्र शेवट तसा करू शकलो नाही. हार जीत होत असते मी कोणाला दोष देऊ इच्छित नाही कारण संघात अझहर अलीला वगळले तर सगळे युवा खेळाडू होते." असे बाबर आझमने अधिक सांगितले. एकूणच प्रमुख गोलंदाज बाहेर असल्यामुळे पराभवाला सामोरे जावे लागले असे बाबरने म्हटले. 

इंग्लंडचा संघ तब्बल 17 वर्षानंतर पाकिस्तानात कसोटी मालिका खेळण्यासाठी आला होता. मात्र 3 सामन्यांच्या मालिकेतील तिन्ही सामने जिंकून पाहुण्या संघाने वर्चस्व राखले. एका वर्षात पाकिस्तानच्या धरतीवर 4 कसोटी गमावणारा कर्णधार म्हणून बाबर आझमच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title: Babar Azam reacts after Ben Stokes-led England whitewash Pakistan in Test series 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.