Babar Azam ODI WC 2023 : आशिया चषक २०२३ वरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाद सुरू आहे... आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळालेले आहे, परंतु BCCI ने पाकिस्तान दौरा करणार नसल्याचे स्पष्ट जाहीर केले. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून (PCB) भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. अशात पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याने मोठं विधान केलं आहे. दोनवेळा आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम वन डे क्रिकेटपटू ठरलेल्या बाबरने २०२३ वर्षातील त्याच्या ध्येयांबाबत ICC ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
बाबरने ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये मागील २४ महिन्यांत बरंच काही अचिव्ह केलं आहे, परंतु त्याला भारतात होणारा वर्ल्ड कप खुणावतोय.. भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये वन डे वर्ल्ड कप होणार आहे आणि तो जिंकण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. आयसीसीच्या वन डे फलंदाजांमध्ये बाबर जुलै २०२१पासून नंबर वन आहे आणि त्यामुळेच मागील दोन वर्षांत तो वन डेतील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला आहे. आता बाबरला पाकिस्तान संघासाठी वन डे वर्ल्ड कप जिंकायचा आहे आणि संघाला नंबर वन टीम बनवायचे आहे.
२८ वर्षीय बाबर आजमने भारतात जाऊन वर्ल्ड कप जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आणि तेच ध्येय असल्याचे मत व्यक्त केले. इम्रान खान यांच्यानंतर बाबरला पाकिस्तान संघासाठी वर्ल्ड कप जिंकायचा आहे. ''वर्ल्ड कप संघाचा सदस्य होण्याचा आणि देशासाठी तो जिंकण्याचा माझा निर्धार आहे. वर्ल्ड कप येत आहे आणि चांगली कामगिरी करण्याची माझी महत्त्वाकांक्षा आहे, जेणेकरून आम्ही तो जिंकू शकू. वैयक्तिक आयुष्यात अनेक ध्येय आहेत, परंतु सध्या मला वर्ल्ड कप जिंकणे, हेच ध्येय खुणावतेय.''
पाकिस्तानने २०२२ मध्ये ९ वन डे सामने खेळले आणि त्यापैकी एकच ( वि. ऑस्ट्रेलिया) त्यांनी गमावला. २०२३च्या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची मालिका आणि आशिया चषक स्पर्धा होणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"