पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानात आजपासून आशिया चषकाच्या स्पर्धेला सुरूवात होत आहे. सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुल्तान येथे होत आहे. खरं तर अनेक नाट्यमय घडामोडींनंतर या स्पर्धेला प्रारंभ होत आहे. पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमनं या मोठ्या स्पर्धेबद्दल मोठं विधान केलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचं भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) स्पष्ट केलं. त्यामुळे आशिया चषक २०२३ श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये खेळवला जात आहे.
बाबर आझमची 'मन की बात'दरम्यान, बीसीसीआयच्या भूमिकेवर पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमनं जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. नेपाळविरूद्धच्या सलामीच्या सामन्यापूर्वी बाबर आझमनं पत्रकार परिषदेत सांगितलं की, तुम्ही मला विचाराल तर संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्ये झाली असती तर बरं झालं असतं, पण दुर्दैवानं आता याबाबत काहीही करता येत नाही.
नेपाळविरूद्धचा सामना झाल्यानंतर पाकिस्तानी संघ ३१ ऑगस्ट रोजी भारताविरूद्धच्या सामन्यासाठी श्रीलंकेला रवाना होईल. भारत आणि पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी २ सप्टेंबरला आमनेसामने असतील. अफगाणिस्तानला वन डे मालिकेत पराभूत करून पाकिस्तानी संघाने वन डे क्रमवारीत अव्वल स्थान गाठलं आहे. "आम्ही वेळ आल्यावर भारताविरूद्धच्या सामन्याबद्दल रणनीती आखू. मी जेव्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली तेव्हाच ठरवलं की संघाची विचारसरणी बदलायची आणि त्यात मला यश आल्याचं दिसतं", असंही बाबर आझमनं म्हटलं.
आशिया चषकासाठी पाकिस्तानी संघ -बाबर आझम (कर्णधार), अब्दुला शफीक, फखर झमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैयब ताहिर, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शादाब खान, मोहम्मद नवाज, उस्मान मीर, फहीम अशरफ, हारिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, सौद शकील, शाहीन आफ्रिदी. (राखीव - तैय्यब ताहिर)
आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - ३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल