पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) याचे क्रिकेट चाहते कौतुक करत आहेत. बाबर आजम आगामी लंका प्रीमिअर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे, परंतु त्याने बेटींग करणाऱ्या कंपनीचा लोगो जर्सीवर लावण्यास नकार दिला आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये अनेक फ्रँचायझींच्या जर्सीवर बेटींग कंपनीचा लोगो पाहायला मिळतो. पण, बाबरने LPL मध्ये बेटींग कंपनीची कोणत्याची प्रकारे जाहीरात न करण्याचा निर्णय घेतला आहे.
''LPLमध्ये सहभाग घेणाऱ्या अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी फ्रँचायझी मालक व आयोजकांना बेटींग कंपनींशी संबंधित असलेला लोगो जर्सीवर लावणार नसल्याचा किंवा त्यांची कोणत्याही प्रकारे जाहीरात करणार नसल्याचे सांगितले आहे,''अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी सीनियर खेळाडू मोहम्मद रिझवान याने पाकिस्तान सुपर लीगमध्ये हा निर्णय घेतला होता.
गंमत अशी की, पाकिस्तानातील काही खेळाडू सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्यांच्या जाहिराती न करण्याची भूमिका घेत असताना, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि काही PSL फ्रँचायझींनी लीगच्या शेवटच्या आवृत्तीत सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्यांनी प्रायोजित केले होते. ज्यामध्ये खेळाडूंनी सट्टेबाजी कंपन्यांचे लोगो त्यांच्या जर्सीवर वापरले होते.
बेटिंग वेबसाइट ही पीएसएलमधील पीसीबीच्या मुख्य प्रायोजकांपैकी एक आहे. सूत्राने सांगितले कोलंबो स्ट्रायकर्स फ्रँचायझीसोबत केलेल्या करारामध्ये बाबरने अशा जाहीरातींना नकार दिला आहे. ३० जुलै ते २२ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या LPLमध्ये बाबर कोलंबो स्ट्रायकर्सचे नेतृत्व करणार आहे. बाबर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर श्रीलंकेत राहून कोलंबो फ्रँचायझीचे नेतृत्व करेल अशी अपेक्षा आहे.