पाकिस्तान क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. या दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या पाकिस्तान संघात बरीच खांदेपालट झाली. पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद पटकावून देणाऱ्या सर्फराज अहमदची उचलबांगडी करण्यात आली. त्याच्या जागी ट्वेंटी-20 संघाचे नेतृत्व बाबर आझमकडे, तर कसोटी संघाचे नेतृत्व अजहर अलीकडे सोपवण्यात आले आहे. पाकिस्तानचा संघ ट्वेंटी-20 मालिकेतून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात करणार आहे. कर्णधार म्हणून या मालिकेत मैदानावर उतरण्यापूर्वी आझमनं भारतीय कर्णधार विराट कोहलीबद्दल मोठं विधान केलं.
वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरी आणि घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने सर्फराजची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला. वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पाकिस्तानच्या संघामध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. निवड समिती अध्यक्ष आणि प्रशिक्षकांनाही बदलण्यात आले आहे. पण तरीही पाकिस्तानची कामगिरी सुधारताना दिसत नाही. त्यामुळे आता अहमदला कसोटी आणि ट्वेंटी-20 संघाच्या कर्णधारपदावरून डच्चू देण्यात आला आहे.
25 वर्षीय आझमने 33 ट्वेंटी-20 सामन्यांत 49.61 च्या सरासरीनं 1290 धावा केल्या आहेत. पाकिस्तानच्या ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार आझम म्हणाला की,''वर्तमानातील कर्णधार विराट कोहली आणि केन विलियम्सन यांना मी फॉलो करतो. त्यांनी वैयक्तिक कामगिरीचा आलेख उंचावताना संघाला सातत्यानं यश मिळवून दिले आहे. त्यांच्यासारखेच नेतृत्व मला करायचे आहे. सामन्याचा निकाल काय लागेल, याचा अधिक विचार न करता मला खेळायचे आहे. संघातील खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी कशी करून घेता येईल, हा माझा प्रयत्न असेल. त्याचबरोबर वैयक्तिक कामगिरीवरही लक्ष असेल.''
पाकिस्तानचा ट्वेंटी-20 संघ - बाबर आझम ( कर्णधार), असीफ अली, फाखर जमान, हॅरीस सोहैल, इफ्तीकार अहमद, इमाद वासीम, इमाम-उल-हक, खुशदील शाह, मोहम्मद आमीर, मोहम्मद हसनैन, मोहम्मद इरफान, मोहम्मद रिझवान, मुहम्मद मुसा, शाबाद खान, उस्मान कादीर.
ऑस्ट्रेलियाचा ट्वेंटी-20 संघ - अॅरोन फिंच, अॅश्टन अॅगर, अॅलेक्स करी, पॅट कमिन्स, बेन मॅकडेर्मोट, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, बिली स्टॅनलेक, मिचेल स्टार्क, अॅस्टन टर्नर, अॅड्य्रु टाय, डेव्हीड वॉर्नर, अॅडम झम्पा.
Web Title: Babar Azam wants to emulate Kane Williamson and Virat Kohli as captain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.