नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज बाबर आझम (Babar Azam) सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानच्या संघाचा कर्णधार बाबर एकदिवसीय आणि टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान आहे. तो आताच्या घडीला एकमेव असा क्रिकेटर आहे, जो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये अव्वल स्थानावर कायम आहे. २७ वर्षीय बाबरकडे सध्या पाकिस्तानच्या संघाची कमान आहे. बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तानचा संघ १६ ऑगस्टपासून नेदरलॅंडविरूद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दरम्यान, एकदिवसीय मालिकेपूर्वी बाबर आझमला सितारा-ए-पाकिस्तान हा देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
बाबर आझमला 'सितारा-ए-पाकिस्तान'चा पुरस्कारआगामी मालिकेपूर्वी बाबर आझमला हा पुरस्कार प्रदान करून पाकिस्तानने देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नामांकित खेळाडूंचा गौरव केला आहे. पुरूष क्रिकेट संघातील बाबरला सितारा-ए-पाकिस्तान (Sitara-e-Pakistan) हा पुरस्कार देण्यात आला. तर पाकिस्तान महिला संघाची कर्णधार बिस्माह मारूफ हिला तमगा-ए-पाकिस्तान (Tamgha-e-Pakistan) हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अंध क्रिकेटपटू मसूद जानला (Masood Jan) प्राइड ऑफ परफॉर्मेंस (Pride Of Performance) पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) या तिन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
पीसीबीने खेळाडूंचे अभिनंदन करताना म्हटले, "मसूद जान (अंध क्रिकेटर), पाकिस्तान पुरूष संघाचा कर्णधार बाबर आझम आणि पाकिस्तान महिला संघाची कर्णधार बिस्मार मारूफ पाकिस्तानच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले." पाकिस्तानचा आज म्हणजेच १४ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वा स्वातंत्र्यदिन आहे.