Join us  

T20 World Cup, Babar Azam : आई Ventilator होती अन् बाबर आजम देशासाठी टीम इंडियाला भिडला; पाकिस्तानी कर्णधाराच्या वडिलांची पोस्ट व्हायरल

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यानं तीन सामन्यांत दोन अर्धशतकी खेळी केल्या आहेत. शांत, संयमी पण, लढाऊ वृत्तीच्या बाबरची एक भावनिक बाजू समोर आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 5:53 PM

Open in App

T20 World Cup, Babar Azam :  पाकिस्तानी संघाची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी ही सर्वांना अवाक् करणारी ठरतेय. आतापर्यंत पाकिस्ताननं ग्रुप २ मधील तीनही सामने जिंकून उपांत्य फेरीतील स्थान पक्कं केलं आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम, सलामीवीर मोहम्मद रिझवान, अनुभवी शोएब मलिक आणि शाहिन आफ्रिदी, आसिफ अली, हसन अली, हॅरीस रौफ हे युवा खेळाडू प्रतिस्पर्धींची तारांबळ उडवत आहेत. सर्वांना पाकिस्तानचं यश दिसत आहे आणि बाबर आजमचे विजयानंतरचे हास्य आठवत आहे. पण, हा हसऱ्या चेहऱ्यामागे एक दुःख. चिंता लपवून बाबर मैदानावर खेळतोय.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम यानं तीन सामन्यांत दोन अर्धशतकी खेळी केल्या आहेत. शांत, संयमी पण, लढाऊ वृत्तीच्या बाबरची एक भावनिक बाजू समोर आली आहे. बाबरचे वडील आजम सिद्धीकी ( Azam Siddique) यांची आजची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी एक धक्कादायक  सत्य समोर मांडले. भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) यांच्यात मैदानावर हायव्होल्टेज सामना सुरू असताना बाबरची आई हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होती.  इतकेच नव्हे बाबर ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये तीनही सामने खेळला, तेव्हा त्याची आई व्हेंटिलेटरवरचर होती, असेही त्यांनी सांगितले.

''हे सत्य देशवासियांना माहित पडायला हवं. पाकिस्तानचे तिन्ही विजयासाठी अभिनंदन. राष्ट्रीय संघ मैदानावर प्रतिस्पर्धींचा सामना करत असताना आमच्या कुटुंबियांचीही घरी कसोटीच सुरू होती. भारत-पाकिस्तान लढतीच्या दिवशी, बाबरची आई व्हेंटिलेटरवर होती. बाबर या तिन्ही लढतींत प्रचंड तणावाखाली होता,''असे त्यांनी लिहिले.  

''मी सामना पाहण्यासाठी इथे येणं अपेक्षित नव्हतं, परंतु बाबर खचून जाऊ नये यासाठी मी आलो. हे सांगण्यामागे एकच कारण आहे की, राष्ट्रीय हिरोंवर कोणतंही कारण नसताना टीका करू नका,''असेही ते म्हणाले.  

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान ( PAKISTAN V AFGHANISTAN)आसिफ अलीनं १९व्या षटकात ४ षटकार खेचून पाकिस्तानला ५ विकेट्स व ६ चेंडू राखून विजय मिळवून दिला. अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४७ धावा केल्या. कर्णधार मोहम्मद नबी व गुलबदीन नैब यांनी प्रत्येकी नाबाद ३५ धावा केल्या. नजिबुल्लाह जाद्राननं २२ धावा केल्या. प्रत्युत्तरात कर्णधार बाबर आजमनं ५१ व फाखर जमाननं ३० धावांची खेळी करून पाकिस्तानचा डाव सारवला. आसिफनं  ७ चेंडूंत नाबाद २५ धावा करून पाकिस्तानचा विजय पक्का केला.  

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१पाकिस्तानबाबर आजमभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App