PAK vs SL : पाकिस्तानी संघ आशिया चषकाच्या स्पर्धेतून बाहेर झाला आहे. आशियाई किंग्ज श्रीलंकेने सांघिक खेळी करत बाबर आझमच्या संघाचे आव्हान संपुष्टात आणले. त्यामुळे रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना खेळवला जाईल. पावसाच्या कारणास्तव सामना उशीरा सुरू झाल्याने ४२ षटकांची लढत झाली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंकेने दोन गडी राखून विजय साकारला. पाकिस्तानच्या पराभवानंतर संघाचा माजी खेळाडू शोएब अख्तरने सारवासारव केल्याचे पाहायला मिळाले.
शोएब अख्तरने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत म्हटले, "पाकिस्तान आशिया चषकातून बाहेर झाला आहे. झमान खानने अप्रतिम कामगिरी करून सामन्यात पुनरागमन केले होते. शाहीन आफ्रिदीने देखील बळी घेतले पण श्रेय झमानचे आहे. पाकिस्तानने स्पर्धेचा अंतिम सामना खेळावा असे जगाला वाटत होते. पण आता संघावर टीका केली जाईल. भारत आणि पाकिस्तान कधीच अंतिम सामना होऊ शकला नाही. श्रीलंका या विजयासाठी पात्र होती हे विसरून चालणार नाही."
पाकिस्तानच्या तोंडचा घास श्रीलंकेने पळवलानाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित ४२ षटकांत ७ बाद २५२ धावा केल्या होत्या. तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून कुसल मेंडिस (९१), चरिथ असलंका नाबाद (४९) आणि सदीरा समरविक्रम (४८) या त्रिकुटाने अप्रतिम कामगिरी केली. शेवटच्या काही षटकांमध्ये शाहीन आफ्रिदी आणि इफ्तिखार अहमद यांनी गोलंदाजीत कमाल केली अन् सामना पाकिस्तानकडे फिरवला. पण, अखेरच्या दोन चेंडूवर सहा धावांची गरज असताना झमान खानच्या षटकातील पाचव्या चेंडूवर चौकार गेला. मग अखेरच्या एका चेंडूत दोन धावांची आवश्यकता होती. असलंकाने अखेरचा चेंडू लेग साइडला टोलवून दोन धावांच्या मदतीने आपल्या संघाला फायनलचे तिकिट मिळवून दिले.
पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने ७३ चेंडूत ८६ धावांची नाबाद खेळी करून श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभारला. त्याच्याशिवाय अब्दुला शफीक (५२) आणि इफ्तिखार अहमद (४७) यांनी पाकिस्तानचा डाव सावरला. खरं तर हारिस रौफ आणि नसीम शाह यांच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या पाकिस्तानला निसटता पराभव स्वीकारावा लागला.