पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं संघाच्या सातत्यपूर्ण अपयशानंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. स्टार बॅटर बाबर आझम याला संघातून डच्चू देण्यात आला आहे. इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित २ कसोटी सामन्यासाठी पाक संघाने नुकतीच घोषणा केली. यात बाबर आझमसह शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाहा यांचाही पत्ता कट झाला आहे. आधी कॅप्टन्सी गेली आणि आता बाबर आझमवर संघातून बाहेर होण्याची वेळ आली आहे.
फखर झमानची माजी कॅप्टन बाबर आझमसाठी बॅटिंग
या प्रसंगी पाकिस्तानचा व्हाईट-बॉल क्रिकेट स्पेशालिस्ट फखर झमान (Fakhar Zaman) हा त्याच्याकडून बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरला आहे. फखर झमान याने थेट टीम इंडियाचा स्टार विराट कोहली याच्या संघर्षाची स्टोरी आकडेवारीसह मांडत बाबर आझमला वगळणं पाकिस्तान क्रिकेटसाठी चांगले संकेत नाहीत, असे म्हटले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं बाबरला दिला डच्चू
बाबर आझम एका एका धावेसाठी संघर्ष करताना दिसतो आहे. मागील नऊ कसोटी सामन्यात बाबर आझमला अर्धशतकी खेळी करता आलेली नाही. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात अपयशी ठरलेल्या बाबर आझमला इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील मुल्तानच्या मैदानात रंगलेल्या कसोटी सामन्यात धावा करता आल्या नाही. त्यानंतर आता त्याला थेट संघातून बाहेर करण्याचा मोठा निर्णय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला आहे.
बाबर ड्रॉप, पाक क्रिकेटरला आठवला विराट, कारण...
बाबर आझमला संघातून वगळल्यानंतर पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमान याने आपलं मत व्यक्त केले आहे. यासाठी त्याने टीम इंडियाचा दाखला देत थेट विराट कोहलीची आकडेवारी मांडली आहे. २०२० ते २०२३ या कालावधीत विराट कोहली हा देखील धावांसाठी संघर्ष करत होता. २०२० मध्ये त्याने १९.३३, २८.२१ आणि २०२३ मध्ये २६.५० च्या सरासरीने धावा काढल्या. या परिस्थितीत टीम इंडियाने त्याला बाकावर बसवले नाही, असे म्हणत बाबर संदर्भात घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे मत पाकिस्तानी क्रिकेटरनं मांडले आहे.
प्रमुख खेळाडूला साथ द्या!
बाबर आझमच्या रुपात पाकिस्तानच्या संघाला आतापर्यंतचा सर्वोत्तम फलंदाज मिळाला आहे. त्याच्यासंदर्भात घेतलेला निर्णय पाकिस्तान क्रिकेटमध्ये एक नकारात्मक संदेश देणारा आहे. प्रमुख खेळाडूंवर कठोर कारवाई करण्यापेक्षा कठीण परिस्थितीत त्यांना बोर्डानं साथ दिली पाहिजे, अशा आशयासह मत पाकिस्तानी क्रिकेटरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले आहे.
Web Title: Babar Drop! After that, the Pakistani cricketer took out Virat's statistics
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.