Join us  

Ruturaj Gaikwad : आपला गडी लय भारी; ऋतुराज गायकवाडचे सलग दुसरे शतक, १९ चेंडूंत जोडल्या ८६ धावा

Ruturaj Gaikwad : महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा तुफान फॉर्मात आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्यानं सलग दुसरे शतक झळकावताना संघाला विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 4:52 PM

Open in App

Back to back hundreds for Ruturaj Gaikwad : महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा तुफान फॉर्मात आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्यानं सलग दुसरे शतक झळकावताना संघाला विजय मिळवून दिला. मंगळवारी मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात १३६ धावांची मॅच विनिंग खेळी करणाऱ्या ऋतुराजनं आज छत्तीसगडच्या गोलंदाजांची धुलाई करताना महाराष्ट्राला ८ विकेट्सनं विजय मिळवून दिला. मध्य प्रदेश विरुद्ध ३२९ धावांचा पाठलाग करताना ऋतुराजनं १३६ धावा केल्या होत्या आणि आज २७६ धावांचा पाठलाग करताना त्यानं निम्म्या धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करताना छत्तीसगडनं ७ बाद २७५ धावा केल्या. छत्तीसगडची अवस्था ४ बाद ६९ अशी झाली असताना अमनदीप खरे व शशांक सिंग यांनी डाव सावरला. अमनदीपनं ८२ धावांची, तर शशांकनं ६३ धावांची खेळी केली. अजय मंडल ( २८), आशुतोष सिंग ( ३३) व शुभम अग्रवाल ( २२) यांनी छोटेखानी खेळी केली. महाराष्ट्राकडून मुकेश चौधरीनं ६७ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. राहुल त्रिपाठीनं २ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात महाराष्ट्रानं सहज विजय मिळवला. कर्णधार ऋतुराजनं १४३ चेंडूंत  नाबाद १५४ धावा चोपल्या. त्यातील ८६ धावा या १४ चौकार व ५ षटकार अशा १९ चेंडूंत जोडल्या गेल्या. यश नाहरनं ५२ धावांची खेळी करताना ऋतुराजसह पहिल्या विकेटसाठी १२० धावा जोडल्या. नौशाद शेखनं ३७ व राहुल त्रिपाठीनं २३ धावा केल्या. महाराष्ट्रानं ४७ षटकांत २ बाद २७६ धावा करून सलग दुसरा विजय मिळवला. 

कालच्या सामन्यात मध्यप्रदेशनं  ६ बाद ३२८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कर्णधार ऋतुराज व यश नाहर यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. यश ४९ धावांवर माघारी परतल्यानंतर नौशाद शेख ( ३४), राहुल त्रिपाठी ( ५६) यांनी ऋतुराजला चांगली साथ दिली. संघाला विजयासाठी ६० धावांची गरज असताना ऋतुराज बाद झाला. त्यानं ११२ चेंडूंत १४ चौकार व ४ षटकारांसह १३६ धावा केल्या. अंकित बावणे ( २४*) व  स्वप्निल फुलपागर ( २२*) यांनी दमदार खेळ करताना महाराष्ट्राचा विजय पक्का केला. महाराष्ट्रानं ४९.४ षटकांत ५ बाद ३३० धावा करून विजय मिळवला.  

टॅग्स :ऋतुराज गायकवाडविजय हजारे करंडकमहाराष्ट्रछत्तीसगड
Open in App