आयपीएलचे अर्धे सत्र आटोपले आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यंदा देखील बाहेर पडेल, हे जवळपास निश्चित झाले.अन्य संघ बाद फेरी गाठण्यच्या विचारात असताना आयपीएलच्या या टप्प्यावर आता चमत्कारच आरसीबीला वाचवू शकतो. आरसीबीची समस्या त्यांच्या गोलंदाजीत आहे. संघ फारच दडपणात असून अनुभवी टीम साऊदी आंद्रे रसेलपुढे गोलंदाजी करताना दडपण त्याच्या चेहऱ्यावर झळकत होते.
यंदाच्या सत्रात हे देखील निदर्शनास आले की काही भारतीय खेळाडू मागील सत्रात अपयशी ठरलेच शिवाय यंदा देखील कुठलेही योगदान देताना दिसत नाहीत. टी२० गोलंदाजांना फार समस्या येतात, हे मान्य आहे. चार षटकात ते काही करू शकत नाहीत. पण मोठी रक्कम घेऊन संघात स्थान मिळविणाºया गोलंदाजांबाबत फ्रेन्चाइजी दोनदा विचार करू शकेल. यातून ते काही बोध घेतील का, हा प्रश्न उपस्थित होतो.
चेन्नईविरुद्ध सामना गमविल्यानंतरही केकेआरकडे घरच्या मैदानावर बाजी मारण्याची संधी असेल. ईडनवर हा संघ नेहमीच चांगला खेळतो. दिल्ली कॅपिटल्ससाठी केकेआरविरुद्धची लढत सोपी राहणार नाही. आंद्रे रसेल सातत्याने धावा काढत आहे. चेन्नईत केकेआरचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्यानंतरही रसेल खेळपट्टीवर कायम होता.
दिल्ली संघाला याच गोष्टीकडे लक्ष द्यावे लागेल. याशिवाय स्वत:ची फलंदाजी सुधारण्याचे देखील दिल्लीपुढे आव्हान असेल. दिल्लीचे अनेक फलंदाज डोेकेबाज फलंदाजी करण्यापेक्षा ‘ग्लॅमर शॉट’ खेळण्याच्या प्रयत्नात असतात. यावेळी मात्र प्रशिक्षकाने त्यांची कानउघाडणी केली असावी.
नवोदित खेळाडू आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करतात तेव्हा निवडकर्त्यांचे लक्ष त्यांच्यावर जाते. दुसरीकडे दिग्गज खेळाडू कसेही खेळले तरी राष्टÑीय संघामधील त्यांच्या निवडीमध्ये कोणताही अडथळा येत नाही, ही खरी समस्या आहे. यामुळे वरिष्ठ खेळाडूंमध्ये आत्मसंतुष्टी व शिथिलतेचा संचार होतो. यामुळेच त्यांच्यातील खराब फटके मारण्याची सवय वाढीस लागते. चिंता न बाळगता खेळणे आणि चिंतामुक्त खेळणे यात किंचित तफावत आहे.