टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant)संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. ऋषभ पंत 30 डिसेंबर 2022 रोजी कार अपघातात गंभीर जखमी झाला होता. यामुळे त्याला आयपीएल 2023 पासूनही बाहेरच रहावे लागले आहे. अशा स्थितीत तो पुन्हा मैदानात केव्हा उतरणार, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. यातच, आता ऋषभ पंतच्या पुनरागमनावर भारतीय संघाच्या एका माजी कर्णधाराने मोठे वक्तव्य केले आहे.
ऋषभ पंतच्या पुनरागमनावर मोठी बातमी - आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेट संचालक सौरव गांगुलीसाठी सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक ऋषभ पंतची जागा भरून काढणे आहे. यासंदर्भात बोलताना सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाला, 'मी त्याच्यासोबत अनेक वेळा बोललो. तो सध्या जखमा आणि सर्जरीनंतर, कठीन परिस्थितीचा सामना करत आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी मी कामना करतो. तो कदाचित एक वर्ष अथवा काही वर्षांत पुन्हा भारतासाठी खेळू शकेल.'
पंतच्या पर्यायाची घोषणा बाकी - पंतला आयपीएल दरम्यान काही काळ संघासोबत बघायला आवडेल? जेणेकरून त्याला रिकव्हरीसाठीही मदत मिळू शकेल? यावर गांगुली म्हणाला, 'माहीत नाही. आम्ही विचार करू.' दिल्ली संघाने अद्यापपर्यंत पंतच्या पर्यायाची घोषणा केलेली नाही. याशिवाय, युवा अभिषेक पोरेल आणि अनुभवी शेल्डन जॅक्सन यांच्यापैकी चांगला कोण? यासंदर्भात गांगुलीने अद्यापही निर्णय घेऊ शकलेला नाही. डेव्हिड वॉर्नरकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच अक्षर पटेल या सत्रात उपकर्णधार असेल.