नवी दिल्ली : क्रिकेटपटू एस बद्रिनाथ हा एक गुणी फलंदाज. पण भारतीय संघात स्थान मिळत नाही, हे बघून तो वैतागला आणि अखेर त्याने एक निर्णय घेतला आहे.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 32 शतके लगावली. 54.49च्या सरासरीने त्याने 10, 245 धावा केल्या होत्या. पण काही केल्या भारतीय संघाचे दरवाजे आपल्यासाठी उघडणार नाहीत, हे त्याला कळून चुकले आणि त्यामुळेच त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
आज बद्रीनाथचा वाढदिवस आहे. तो 38 वर्षांचा झाला. आपल्या वाढदिवशी निवृत्तीचा निर्णय घेत त्याने साऱ्यांनाच धक्का दिला आहे.
" खरं सांगायचं तर माझ्यासाठी हा निर्णय घेणे सोपे नव्हते. मी काशी विश्वनाथ यांना याबाबतचे पत्र लिहीले आहे. हे पत्र लिहिताना माझे हात थरथरत होते. पण हा निर्णय घेणे माझ्यासाठी भाग होते," असे बद्रिनाथने सांगितले आहे.
बद्रिनाथने 2010-11 साली 10 आंतरराष्ट्रीय सामने खेळले होते. कसोटी क्रिकेटच्या पदार्पणातच त्याने अर्धशतक झळकावले होते. त्याचे हे अर्धशतक पहिल्याच डावात आले होते. बद्रीनाथने दोन कसोटी, सात एकदिवसीय आणि एका ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधत्व केले होते.