Join us  

मुंबई इंडियन्स स्पर्धेतील संतुलित संघ

 - अयाझ मेमनसंपादकीय सल्लागारमुंबई इंडियन्स संघाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. कारण एकूण परिस्थिती पाहिली, तर ...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 4:42 AM

Open in App

 - अयाझ मेमनसंपादकीय सल्लागारमुंबई इंडियन्स संघाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमी आहे. कारण एकूण परिस्थिती पाहिली, तर मुंबईसाठी हे आव्हान कठीण होते. सर्वात महत्त्वाचे चेन्नई गतविजेता संघ होता आणि सामना त्यांच्याच घरच्या मैदानावर होता. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मिळविलेला विजय पाहता, मुंबई संघ किती संतुलित आहे, याची जाणीव होते. याशिवाय तांत्रिकदृष्ट्याही मुंबईने चेन्नईवर वर्चस्व राखले.माझ्यामते चेन्नई संघ स्वत:च्याच जाळ्यात अडकले. कारण त्यांनी आपल्या संघातील फिरकीपटूंना फायदेशीर ठरेल, अशी खेळपट्टी तयार केली. नाणेफेकही त्यांनीच जिंकला आणि १५०-१६०च्या आसपास धावा केल्यास मुंबई अडकेल, असा अंदाज चेन्नईने बांधला होता, असे झालेही असते. मात्र, मुंबईकडेही त्याच तोडीचे फिरकीपटू आहेत, याचा चेन्नईला विसर पडला असावा. राहुल चहरने शानदार फिरकी मारा केला, तसेच चेन्नईने आपले पहिले तीन प्रमुख फलंदाज झटपट गमावले. त्याउलट मुंबईसाठी सूर्यकुमार यादवने संघाचा संपूर्ण डाव सावरला. या जोरावरच मुंबईने अंतिम फेरीत स्थान मिळविले आणि आता चेन्नईला झुंजार खेळ करून अंतिम फेरीत प्रवेश करावा लागेल. तरी, क्रिकेटप्रेमींना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स या आयपीएलमधील कट्टर प्रतिस्पर्धी संघामध्ये अंतिम फेरीचा सामना पाहण्यास नक्की आवडेल, पण मुंबईविरुद्ध अंतिम सामन्यात वेगळा संघही पाहण्यास मिळू शकतो.चेन्नई आणि मुंबई प्रत्येकी तीन वेळा विजेते ठरले आहेत. जर हे दोन संघ पुन्हा आमनेसामने आले, तर नक्कीच कडवी टक्कर पाहण्यास मिळेल. आयपीएलच्या इतिहासावर नजर टाकल्यास कळेल की, स्पर्धेतील सर्वात संतुलित संघ मुंबई आणि चेन्नई हेच आहेत. त्यामुळे हेच दोन संघ अंतिम सामन्यात लढले, तरी कोणलाही आश्चर्य वाटणार नाही, पण जर दिल्ली कॅपिटल्स संघाने अंतिम फेरी गाठली, तर मात्र पहिल्यांदाच नवीन विजेताही पाहण्यास मिळेल.महिलांची टी२० लीग सुरू करणे बीसीसीआयचे मोठे पाऊल ठरले आहे. गेल्या वर्षी केवळ आश्वासनेच मिळत असल्याचे वाटत होते. महिला क्रिकेटला प्रोत्साहन मिळत नसल्याचे दिसत होते, पण असे नव्हते. यंदा महिला क्रिकेटपटूंना मोठी संधी मिळाली असून, या खेळाडूंच्या सामन्यासाठी उपस्थित प्रेक्षकसंख्येकडे पाहू नये, असे मला वाटते. याउलट सातत्याने महिलांच्या अशा लढती खेळविण्यात येतात का, हे पाहावे. प्रेक्षक येतीलच, पण त्या आधी सातत्याने सामने खेळविणे गरजेचे आहे. पहिल्या सामन्यात स्मृती मानधना आणि हरमनप्रीत या दोन्ही भारतीयांनी छाप पाडली. या दोघी युवांसाठी रोल मॉडेल ठरत आहेत. आज महिलांच्या टेनिस सामन्याला तुफान गर्दी होते. तो दर्जा गाठण्याची जबाबदारी महिला खेळाडूंवर आहेच, त्याशिवाय व्यवस्थापकांवर अधिक आहे.

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल 2019