नवी दिल्ली : सध्याच्या घडीला फलंदाजाच्या हेल्मेटला चेंडू लागण्याचा घटना घडताना दिसतात. यामध्ये काही वेळा फलंदाज जखमी होतात. काही फलंदाजांना झालेली दुखापत गंभीर स्वरुपाचीही असते. आज क्रिकेटच्या मैदानात अशीच एक गोष्ट पाहायला मिळाली. यावेळी तर फलंदाजाच्या हेल्मेटमध्येच थेट चेंडू घुसल्याचा प्रकार पाहायला मिळाला.
हा प्रकार घडला तो श्रीलंकेमध्ये. सध्या यजमान श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. आज न्यूझीलंडचा संघ फलंदाजी करत होता. त्यावेळी 82व्या षटकात ही गोष्ट घडली.
न्यूझीलंडचा डावखुरा फलंदाज ट्रेंट बोल्ट हा फलंदाजी करत होता. 82 षटकातील एका चेंडूवर त्याने स्विपचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न करत असताना चेंडू थेट बोल्टच्या हेल्मेटमध्ये घुसल्याचे पाहायला मिळाले.
न्यूझीलंडचा पहिला डाव 249 धावांवर आटोपला. या धावसंख्येचा पाठलाग करताना दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेची 7 बाद 227 अशी अवस्था आहे. त्यामुळे पहिल्या डावात कोणता संघ आघाडी घेणार, याची उत्सुकता चाहत्यांना आहे.