ऑकलंड - तिरंगी मालिकेतील पाचव्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पाच विकेट्सनी पराभव करत मालिकेतील आपली विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियासमोर धावांचा डोंगर उभा केला. 244 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने सात चेंडू राखत विजय मिळवला आणि इतिहासात एका नव्या रेकॉर्डची नोंद केली. न्यूझीलंडचा ओपनर मार्टिन गप्टिलने या सामन्यात शतक ठोकत टी-20 मध्ये सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला.
मार्टिन गप्टिल व्यतिरिक्त फलंदाज मार्क चॅपमॅनचं नावही यापुढे अनेकदा चर्चेत राहिल. मार्क चॅपमॅन 14 चेंडूत 16 धावा करत खेळत असताना स्टानलेकच्या गोलंदाजीवर आऊट झाला. मार्क चॅपमॅनची विकेट इतकी अजब पद्धतीने गेली की त्यालाही काहीवेळ विश्वास बसत नव्हता. झाल असं की, 18 व्या ओव्हरमध्ये बिली स्टॅनलेक गोलंदाजी करत होता. स्टॅनलेकने बाऊन्सर फेकला आणि तो जाऊन थेट चॅपमॅनच्या हेल्मेटवर आदळला. यानंतर हेल्मेट थेट स्टम्पवर जाऊन पडलं, ज्यामुळे हिट विकेट म्हणून त्याला आऊट देण्यात आलं. क्रिकेटच्या इतिहासात अशाप्रकारे आपली विकेट गमावताना फार कमी फलंदाजांना पाहिलं गेलं आहे.
दरम्यान ऑस्ट्रेलियन संघाने टी-20 क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या तिरंगी मालिकेत न्यूझीलंडने दिलेल्या 244 धावांच्या आव्हानाचा यशस्वीरित्या पाठलाग करत ऑस्ट्रेलियाने हा विक्रम नोंदवला. आज न्यूझीलंडविरुद्ध 244 धावांच्या आव्हानाचा यशस्वीरीत्या पाठलाग केल्यानंतर ऑस्ट्रलियन संघ टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारा संघ ठरला आहे. याआधी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावे होता.
ऑकलंड येथील इडन पार्क येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्यानंतर मार्टिन गप्टिलचे (105) शतक आणि कॉलिन मुनरोच्या 76 धावांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 244 धावंचे आव्हान ठेवले.
या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकडून आर्की शॉर्टने सर्वाधिक 76 तर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 59 धावा फटकावल्या. त्याबरोबरच ऑस्ट्रेलियन संघ टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणारा संघ ठरला आहे. याआधी टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावे होता. त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरोधात 236 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला होता.