क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असं म्हटलं जातं, मैदानावर काहीही होऊ शकतं ज्यावर अनेकदा विश्वास ठेवणं कठीण असतं. एखाद्या फलंदाजाने मारलेला फटका गोलंदाजाच्या डोक्यावर आदळून षटकार गेल्याचं तुम्ही कधीही पाहिलं नसेल. पण असं घडलं आहे, न्यूझीलंडमध्ये. तुमचा विश्वास बसणार नाही म्हणून व्हिडीओही आम्ही शेअर करत आहोत.
न्यूझीलंडच्या स्थानिक एकदिवसीय सामन्यादरम्यान हा चमत्कारीक फटका पाहायला मिळाला. न्यूझीलंड संघाचा कसोटी सलामीवीर जीत रावल याने हा अफलातून शॉट मारला. येथील फॉर्ड ट्रॉफीतील एका सामन्यात ऑकलंडच्या संघाकडून खेळताना फलंदाज जीत रावल याने कॅंटरबरी संघाचा गोलंदाज आणि कर्णधार अॅंड्रू एलिस याने टाकलेल्या एका चेंडूवर जोरदार प्रहार केला. आक्रमक खेळत असलेल्या जीत रावलने हा शॉट थेट गोलंदाजाच्या दिशेने मारला होता. शॉटचा वेग इतका जास्त होता की गोलंदाज एलिसने स्वतःच्या बचावासाठी खाली वाकण्याचा प्रयत्न केला. पण क्षणार्धात चेंडू एलिसच्या डोक्यावर बरोबर मधोमध येऊन आदळला आणि आश्चर्यकारकरित्या उडून सीमारेषेपार गेला. अंपायरने पहिले चौकार असल्याचा इशारा केला पण लगेच बदलून षटकार असल्याचं स्पष्ट केलं.
पण विशेष म्हणजे इतक्या जोरात बॉल लागल्यानंतरही गोलंदाज एलिसला काहीही झालं नाही. शॉट एलिसच्या डोक्यावर लागल्याचं पाहताच रावल त्याची विचारपूस करण्यास गेला पण तो ठणठणीत उभा होता. सुरक्षेच्या कारणास्तव एलिसला मैदानाबाहेर नेऊन त्याची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. सामना संपायला काही षटकं शिल्लक असताना एलिस मैदानात परतला आणि विशेष म्हणजे त्याने रावलची विकेट देखील घेतली. रावलच्या 149 (153 चेंडू) धावांच्या खेळीमध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याच्या शानदार फलंदाजीच्या बळावर ऑकलंडने हा सामना जिंकला.
पाहा व्हिडीओ -