नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर फिल ह्युजेसचा मैदानात मृत्यू झाला आणि क्रिकेट विश्व हळहळले होते. त्यामुळे आता मैदानात जर एखाद्या खेळाडूला चेंडूला लागला तर त्या गोष्टीची आठवण आल्यावाचून राहत नाही. नेमकीच अशीच एक गोष्ट काही तासांपूर्वी क्रिकेटच्या मैदानात घडली आहे. यावेळी एका क्रिकेटपटूच्या डोक्याला चेंडू लागला आणि तो थेट जमिनीवर कोसळला आणि पुन्हा एकदा सर्वांच्या काळजात धस्स झालं.
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या सामन्यात ही गोष्ट घडली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्ताननेन्यूझीलंडवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर 210 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या सलामीवीराबरोबर हा प्रसंग घडला आहे.
पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हक हा 16 धावांवर खेळत होता. त्यावेळी न्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनचा एक चेंडू इमामच्या हॅल्मेटच्या जाळीला लागला. यानंतर इमाम थेट जमिनीवर कोसळला. त्यावेळी सर्वच त्याच्याजवळ धावत गेले. त्यावेळी इमामचे डोळे उघडत नव्हते. त्यानंतर इमामला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. इमामची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून तो सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे.