सिडनी : चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना कठोर शिक्षा झाली. पण त्यांच्या कुटुंबियांनाही आपले अश्रू लपवता आलेले नाहीत. वॉर्नरची पत्नी कँडीस त्याला सिडनी विमानतळावर भेटायला गेली होती. पण लोकांचा रोष पाहून वॉर्नरला पाहताच त्याच्या पत्नीने रडायलाच सुरुवात केली.
केप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड करणे हा रणनितीचाच असल्याचे मान्य केले. त्यानंतर या साऱ्या प्रकाराचा सूत्रधार वॉर्नर असल्याचे पुढे आले आणि त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्यावर एका वर्षाची बंदी घातली. त्यानंतर बीसीसीआयनेही त्याला आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवला.
वॉर्नर केप टाऊन येथून सिडनीच्या विमानतळावर उतरला. त्यावेळी त्याची पत्नी आपल्या दोन्ही मुलांसह वॉर्नरला भेटायला आली होती. वॉर्नरच्या कृत्याविषयी लोकांच्या मनात चीड होती आणि त्यांनी आपला राग व्यक्त केला. हे सारे पाहून कँडीसाला आपले अश्रू अनावर झाले. त्यामुळे वॉर्नर विमानतळावर जास्त काळ थांबला नाही.
याबाबत वॉर्नर म्हणाला की, " जे काही झाले ते दुर्देवी आहे. या गोष्टीचा फटका मलाही बसला, पण आता या गोष्टीचा त्रास माझ्या कुटुंबियांनाही होत आहे. माझी पत्नी आणि मुले वाईट कालखंडातून जात आहेत. त्यामुळे सध्यातरी मी या प्रकरणावर काही बोलू इच्छित नाही, पण वेळ आल्यावर नक्कीच माझी भूमिका स्पष्ट करेन. "