चेंडू कुरतडणे प्रकरण जगभर गाजलं. ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पुरती बदनामी झाली. मात्र या साऱ्यापलीकडे मैदानाबाहेरचं एक वर्ककल्चर या प्रकरणात दिसतं. जे आपल्यासमोरही वास्तवाचा एक चेंडू टाकतो. आणि ते चेंडू आपल्यालाही कुरतडू शकतो..
चेंडू कुरतडणे प्रकरण जगभर गाजलं. ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पुरती बदनामी झाली. स्टीव्ह स्मिथ मीडियासमोर ढसढसा रडला. वॉर्नर रडला. साºया जगानं ते रडणं पाहिलं. काहींना त्यांच्याविषयी सहानुभूती वाटली, तर अॅशेस मालिकेतील पराभवाचा वचपा काढत ब्रिटिश माध्यमांनी स्मिथच्या रडण्याला नौटंकी म्हटलं. वर्षभराच्या बंदीची शिक्षाही झाली, माफी मागणंही झालं. मात्र इथेच हे प्रकरण संपत नाही. म्हणजे क्रिकेटपुरतं संपतं; पण प्रत्यक्षात मैदानाबाहेर संपत नाही. कारण चूक मैदानावरची असली आणि सभ्य माणसांचा म्हणवणाऱ्या खेळाची लक्तरं जरी वेशीवर टांगली गेली असली तरी प्रत्यक्षात समाज आणि मानवी वर्तन म्हणूनही या गोष्टीत बरंच काही दिसतं.
आणि आपण पॉझिटिव्हली पहायचं ठरवलं तर अनेक अशा गोष्टी दिसतात ज्या आरसा म्हणून आपल्याही पुढे ठेवल्या तर त्यातलं वास्तव कदाचित आपल्यालाही जखमी करेल. मात्र यानिमित्तानं त्याविषयीही बोलायला हवं. आणि त्यातूनही ‘वर्क कल्चर’ आणि आपल्या करिअरमधलं झपाटलेपण, आपल्या कुटुंबाची साथ यासंदर्भातही जरा चाचपून पहायला हवं की, आपण सारे नेमके कुठं उभे आहोत.
चेंडू कुरतडण्याप्रकरणी कर्णधार स्मिथला साºया जगानं व्हिलन ठरवलं. ज्याच्यात ऑस्ट्रेलियन जनता दुसरा ब्रॅडमॅन शोधत होती, ज्याचं क्रिकेटीय दैवत करायला निघाली होती त्या स्मिथला एकदम ‘बॅडबॉय’ ठरवण्यात आलं. ठरलाच तो बॅडबॉय. जो मुलगा स्पिनर होणं जमलं नाही म्हणून स्वत:ला बदलवत बॅट्समन झाला आणि बॅट्समन होता होता अव्वल होत कर्णधारही झाला, त्या नेतृत्वाचाच आॅस्ट्रेलियन माणसं तिरस्कार करू लागली.
ते का?
केवळ चेंडू कुरतडला म्हणून?
ऑस्ट्रेलियन टीम ही कायमच आक्रमक खेळ करण्यासाठी प्रसिद्ध. फक्त क्रिकेटची नाही तर सगळ्याच खेळातली. गेल्या महिला विश्वचषक स्पर्धेत भारताच्या हरमनप्रीत कौरने आॅस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १७१ धावांची अप्रतिम खेळी केली. वनडेच्या इतिहासातली महान खेळी म्हणून तिची नोंद व्हावी अशी ती आक्रमक खेळी होती. मात्र आॅस्ट्रेलियन महिला खेळाडूही डाव संपताच तिच्याआधी तडक मैदानाबाहेर गेल्या, तिला अभिनंदन म्हणण्याचंही सौजन्य कुणी दाखवलं नाही. खिलाडूवृत्ती नावाची गोष्ट सहसा ते दाखवत नाहीत. अपमान, अपयश ते सहन करू शकत नाहीत इतकी खुन्नस धरतात. मैदानावरचं स्लेजिंग तर काही नवीन नाही, ते बाकायदा खेळाचा भाग म्हणून केलं जातं. त्यामुळे आॅस्ट्रेलियन जनता केवळ चेंडूशी छेडछाड केली, ती पकडली गेली म्हणून आपल्या कर्णधारावर नि खेळाडूवर खवळून, संतापेल अशी इतकी ही वरची गोष्ट नाही.
त्या गोष्टीच्या पोटात आहे, ऑस्ट्रेलियन माणसाच्या जगण्याची रीत, वृत्ती आणि समाजमनाची ‘कार्यसंस्कृती’कडे पाहण्याची एक अत्यंत प्रोफेशनल दृष्टी. ती समजून घेतली तर प्रोफेशनल जगण्याची एक वेगळी रीत आपल्याला समजू शकेल. त्यातून शिकावं असंही बरंच काही आहे. कर्णधार स्मिथ आणि वॉर्नर यांनी त्या कार्यसंस्कृतीला नख लावलं असं वाटलं म्हणून आॅस्ट्रेलियन माणसाला आजच्या घडीला जास्त अपमानीत झाल्यासारखं, फसवलं गेल्यासारखं वाटतं आहे.
नव्या आंतरसांस्कृतिक आदानप्रदानाच्या आणि संवादाच्या काळात या कार्यसंस्कृतीच्या पैलूकडेही पहायला हवं.
उदाहरणच द्यायचं तर ऑस्ट्रेलियात साधं एखाद मिनिट उशिरा कामावर पोहचणंही अत्यंत असभ्य मानलं जातं. व्हेरी अनकूल. ठरल्या वेळेवरच माणसं कार्यालयात पोहचतात, का तर आपण कामाविषयी ‘सिरिअस’ आहोत असा एका मेसेज त्यातून स्वत:लाच अपेक्षित असतो. जिथं उशिरा जाणं शिष्टसंमत नाही, तिथं कामाशी प्रतारणा? ती तर भयानक फसवणूकच मानली जाणार. अशा अनेक गोष्टी या घटनेच्या पोटात आहेत. मात्र त्यासोबत कुटुंब नावाच्या सपोर्ट सिस्टिमचाही एक वेगळाच चेहरा स्मिथ-वॉर्नर प्रकरणानं जगासमोर ठेवला. त्यातले हे काही महत्त्वाचे मुद्दे..
१) वरिष्ठांशी थेट-स्पष्ट-रोखठोक
बोलण्याची हिंमत
ऑस्ट्रेलियन कार्यसंस्कृतीनं अनेक पिढ्या हे तत्त्व जिवापाड जपलं. अभिमानानं जपलं. आपले वरिष्ठ म्हणतात म्हणून त्यांना बरं वाटावं म्हणून, येस सर म्हणत गुड बुक्समध्ये राहण्यासाठी, फायद्यासाठी किंवा दबून जाऊन, भीतीपोटी त्यांनी सांगितलेलं काम करण्यास आॅस्ट्रेलियन माणूस तयार होत नाही. निदान हे काम योग्य नाही, मला पटत नाही असं म्हणत आपला निषेध नोंदवतो. नकार देतो प्रसंगी. हे सारं कामाचा भाग म्हणून आणि कामाच्या निष्ठेपोटी करणं योग्यच आहे असं ऑस्ट्रेलियन कार्यसंस्कृती मानते. असं असताना केवळ कर्णधारानं सांगितलं म्हणून वॉर्नरनं चुकीचं काम केलं याचा धक्का ऑस्ट्रेलियन माणसाला जास्त बसला.
जगभरातली माणसं आता ऑस्ट्रेलियात कामाला जातात, तिथलं कामाचं वातावरणही बदलू लागलं आहे, मात्र तरीही तत्त्व म्हणून वरिष्ठाच्या दबावाला बळी न पडता आपलं मत मांडणं याला आॅस्ट्रेलियन माणसाच्या लेखी महत्त्व आहे. वॉर्नरने ते केलं नाही, याविषयीचा संताप म्हणूनच जास्त आहे.
२) टीम मोठीच; पण वैयक्तिक जबाबदारी मोठी
संघ म्हणून खेळतानाही ऑस्ट्रेलियन माणसं वैयक्तिक जबाबदारी, जोखीम आणि कामगिरी याला अधिक महत्त्व देतात. त्यातून व्यक्तिगत जबाबदारी म्हणून माणूस जास्त उत्तम काम करतो असं ते मानतात. त्यामुळेच एकेकाळी शेन वॉर्नच्या प्रेम प्रकरणाचे किस्से जगभरातल्या माध्यमांनी चघळले तरी आॅस्ट्रेलियन समाजानं त्याला कधी प्रश्न केले नाहीत. तो मैदानावर त्याचं काम चोख करतो, व्यक्तिगत आयुष्यात तो काय करतो यात कुणी लक्ष घातलं नाही. यावेळी मात्र मैदानात स्मिथ आणि वॉर्नर चुकले, त्यांनी आपली व्यक्तिगत जबाबदारी योग्यरीतीनं पार पाडली नाही, म्हणूनही फसवणुकीची खंत जास्त छळताना दिसतेय.
३) गोइंग एक्स्ट्रा माइल
आपली व्यक्तिगत जबाबदारी पार पाडताना, पूर्ण प्रयत्न करताना, आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करतानाही इतरांच्या चार पावलं पुढं जाण्याचा अॅटिट्यूड ऑस्ट्रेलियन कामात दिसतो. इथंही वॉर्नर-स्मिथने तेच केलं; पण रस्ता चुकला. यश मिळवण्यासाठी असं दुष्कृत्य करणं उघडं पडलं, हसं झालं हे बरं नव्हे हे तर उघड आहे.
४) स्मिथच्या पाठीवर वडिलांचा हात
आॅस्ट्रेलियाच्या कार्यसंस्कृतीचा भाग आहे, कुटुंब. बाकी जगात वर्क-लाईफ बॅलन्स अशी एक नवीन रीत आली. इथं तसं नाही. कुटुंब हे कामाचा, जगण्याचा भाग आहे. म्हणूनच तर पत्रकार परिषदेत स्थिच्या पाठीशी त्याचे वडील उभे राहतात. ठामपणे. तो त्यांना घरी ठेवून एकटा येत नाही. वॉर्नरची बायको त्याच्यासोबत, त्याच्या बाजूनं बोलते. आपलं काम वेगळं, कुटुंब वेगळं, पर्सनल लाइफ वेगळं असं इथं मानलं जात नाही. आपण आपल्या कामाशी घरच्यांना किती जोडून घेतो, हा नवाच प्रश्न या घटनेनं जगभराला विचारला आहे.- चिन्मय लेले
Web Title: Ball tampering by australian players
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.