Join us  

कुरतडलेल्या चेंडूची करुण कहाणी

सूर्य जसा आग ओकतो, तसं काहीसं त्याचं झालं होतं. शिवण उसवलेली होती. त्याच्या जवळ गेलो, तर तो अंगावर खेकसलाच "काय चालवलंय, तुम्ही हे सारं".

By प्रसाद लाड | Published: March 28, 2018 9:19 AM

Open in App

एकदा असंच मैदानात चालत असताना एक क्रिकेटचा सीझन क्रिकेट बॉल दिसला. तो पूर्णपणे विस्कटलेला होता. त्याचा रंग आधीच लाल. पण तो लालबुंद झाला होता. सूर्य जसा आग ओकतो, तसं काहीसं त्याचं झालं होतं. शिवण उसवलेली होती. त्याच्या जवळ गेलो, तर तो अंगावर खेकसलाच "काय चालवलंय, तुम्ही हे सारं". सुरुवातीला काहीच कळेना. पण तो काही शांत बसणारा नव्हता, ते त्याच्या देहबोलीतून जाणवतं होतं. त्यामुळे त्याला वाट मोकळी करून देणं महत्त्वाचं वाटलं. काय झालं बाबा, बोल ना, असं म्हटल्यावर त्याने आपली व्यथा व्यक्त केली.

क्रिकेट हा तुम्ही सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणता आणि अशी असभ्य कृत्य करता? क्रिकेट हा फलंदाजांचा, धावांचा खेळ असं म्हणता तुम्ही. त्यामुळे मला तुमच्या खेळात तसं महत्त्व नाहीच. पण माझ्याशिवाय तुमचा खेळ पूर्ण होऊ शकत नाही, हे तुम्ही समजून घ्या. तुम्ही मला तसं वाळीतच टाकलं. पण काही गोलंदाजांनी विक्रम रचले आणि काहीवेळा मला आनंद वाटला. पण हा आनंद तसा क्षणभंगुर. माझ्या वाट्याला हाल-अपेष्टाच जास्त. किती अन्याय, अत्याचार झालेत माझ्यावर. तुम्हाला कल्पना तरी आहे का याची?

फलंदाज तर बॅटने मला तुडवतातच. त्यांचं तसं काही मला वाईट वाटत नाही. कारण त्यांचं ते कामच आहे. त्यांनी मला गोंजारावं, असं मला कधीही वाटलं नाही. त्यांच्याकडून कसलीही अपेक्षा नाही. पण जे माझ्या जीवावर मोठे होतात, त्या गोलंदाजांनी तरी किमान तसं करू नये ना. मला हवं तसं वळवता, हवं तसं आपटता, फेकून देता, माझ्यावर राग काढता, कशासाठी हा सारं?

सुरुवातीला तर माझ्या चेहऱ्याला ग्रीसने काळं फासलं गेलं. मी काय वाईट केलं होतं त्यांचं? फक्त हव्यासापोटी त्यांनी मला काळं फासलं. मी शांत राहिलो. त्यानंतर एका गोलंदाजाने माझा चेहरा नखाने खरडवला. एकाने तर कहरच केला. बाटलीच्या तीक्ष्ण झाकणाने त्याने माझ्या चेहऱ्यावर वार केले. तुम्हाला जरासं खरचटलं तर तुमची लाहीलाही होते. माझ्यावरचे हे वार मी कसे सहन केले असतील. या जखमा झाल्यावर कुठलीही मलमपट्टी त्यावर कधीच केली नाही. काही जण माझ्या चेहऱ्यावर माती लावतात, काही जेली बिन्स, तर काही चिकट पदार्थांनी लपून छपून माझा चेहरा कुरुप करतात. तर काही माझ्यावर थुंकतात, हे असं जीवन तुम्ही तरी जगाल का? नियमांत हे बसत नाही, पण बिनदिक्कतपणे सारं राजरोस सुरू आहे. माझी एवढी घृणा कशासाठी. मी काय तुमचं बिघडवलं आहे. माझं काम तर मी चोख बजावतो, मग माझ्या वाट्याला हे अपमानित आयुष्य कशासाठी? आणि हे वाईट प्रकार करण्याचे अधिकार तुम्हाला दिलेत तरी कुणी?

शिवण हा माझ्या शरीराचा मुख्य सांधा. पण त्या सांध्याचीच तुम्ही उसण काढून मला अपंग करायचं काम करता. नखाने माझी शिवण उसवता. धातूच्या वस्तूनं माझ्यावर हल्ले करता. तो पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी. त्याने तर माझा चावाच घेतला होता. त्याचं काय घोडं मारलं होतं मी? तो इम्रान खान, वकार युनूस, शोएब अख्तर, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, फॅफ ड्यू प्लेसिस, माईक आर्थरटन हे सारे माझ्यावर अत्याचार केल्यामुळे दोषी ठरले. पण माझ्यावर विनयभंग करणाऱ्यांची संख्या हातावर मोजण्याइतकी नाहीच. पकडले गेले तेच चोर, पण मग बाकीचे संत नक्कीच नाहीत.

आतापर्यंत मी कधी माझ्यावरच्या अन्यायाविरोधात बोललो नाही. कधी आंदोलन, असहकार पुकारला नाही, हीच माझी चूक का? माझी काही चूक नसताना तुम्ही मला कलंकित करता. जे दोषी ठरतात त्यांच्यावर शिक्षा होते, पण माझं काय? माझा जीव जातोच ना. मला कुणी प्रेमाने एकदा तरी विचारलं आहे का, बाबा रे तुझं म्हणणं काय? प्रत्येक वेळी घासून-पुसून माझा चेहरा विद्रुप करता तुम्ही. सुरुवातीला जेव्हा मला हाताता घेता, तेव्हा चॉकलेट बॉयसारखा असतो मी. चेहऱ्यावर चमक असते. लाली असते. पण त्यानंतर माझं आयुष्य उद्ध्वस्त होत जातं. माझी किंमत कुणालाच नाही.

हा चेंडू काही चुकीचं बोलत नव्हता. कारण त्याच्याबाबतीत हे सारं घडलेलं होतं. तो हे सारं सहन करत आला आहे, हे देखील मान्य होतं. पण सांत्वन करायला शब्द नव्हते. त्याच्यासमोर हात जोडले. आमची चूक झाली, यापुढे तुला असा त्रास होणार नाही, असं बोलून निघालो खरं, पण चेंडूचं हे मनोगत ऐकून मन विषण्ण झालं होतं. काहींचं आयुष्य हे फक्त स्वत:ची झीज करून दुसऱ्यांना उपयोगी पडण्यासाठी असतं, हेच खरं.

(रेखाचित्र : अमोल ठाकूर)

टॅग्स :चेंडूशी छेडछाडक्रिकेटस्टीव्हन स्मिथ