सिडनी : आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने आपल्या देशातील नागरिकांना स्टीव्ह स्मिथला चेंडू छेडछाड प्रकरणात माफ करण्याचे आवाहन केले आहे. क्लार्क म्हणाला,‘दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान स्मिथने चेंडूसह छेडछाड करण्याची योजना आखली होती. त्यामुळे स्मिथवर नागरिकांचा रोष आहे. नागरिकांनी हे प्रकरण विसरून वाटचाल करावी आणि देशाची मलिन झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करावे.’ क्लार्कच्या आवाहनानंतरही स्मिथला सहानुभूती मिळणे कठीण आहे. कारण, फलंदाज कॅमरुन बेनक्राफ्टने चेंडूवर चिकटणारा पिवळा कागद लावून चेंडूचा आकार बदलण्याचा प्रयत्न करावा, अशी योजना स्मिथने आखली होती.
क्लार्कने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ‘मला स्टीव्ह स्मिथप्रती खेद वाटतो. त्याने नक्कीच मोठी चूक केली आहे आणि काही अन्य लोकांना त्याचे मोल चुकवावे लागत आहे. स्मिथला माफ करावे, असे मला वाटते. भविष्यात पुन्हा असे घडायला नको, यावर क्रिकेट आॅस्ट्रेलियाने लक्ष द्यायला हवे.’