मुंबई : दक्षिण आफ्रकेत चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. पण अजूनही त्यांच्यावर जमतेचा रोष कमी झालेला नाही. पण या खेळाडूंकडून चीक झाली, त्यांनी ती मान्यही केली आहे. त्यामुळे आता त्यांना थोडा वेळ द्यायला हवा, असे मत भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे. सचिनने याप्रकरणात ट्विटवर आपले मत व्यक्त केले आहे.
सचिन ट्विटरवर म्हणाला की, " जे काही या खेळाडूंनी केलं त्याबद्दल त्यांना पश्चाताप झाला आहे. पण त्यांना जी काही शिक्षा मिळाली ती त्यांना भोगावी लागणार आहे. पण जरा त्यांच्या कुटुंबियांचा विचार करा. कारण त्यांची काहीही चुक नसताना हे सारे सहन करावे लागत आहे. आता वेळ आला आहे की, या खेळाडूंच्या आयुष्यापासून दूर व्हायला हवे आणि त्यांना काही वेळ द्यायला हवा. "
केप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा क्षेत्ररक्षक चेंडू एका पिवळसर वस्तूवर घासत असल्याचे चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथने प्रसारमाध्यमांसमोर चेंडूशी छेडछाड करणे हा तर रणनितीचाच असल्याचे मान्य केले आहे. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा डागाळली आहे.