नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचे स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे सध्या टीकेचे धनी ठरत आहेत. पण भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने मात्र त्यांचे समर्थन केले आहे. ' लोकांना तुम्हाला रडवायचे आहे ' असे म्हणत अश्विनने स्मिथ आणि वॉर्नर यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.
सिडनी येथील पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा स्मिथ रडला तेव्हा काही क्रिकेटपटूंना वाईट वाटले. स्मिथ आणि वॉर्नर यांनी वाईट कृत्य केले असले तरी त्यांना एवढी जास्त शिक्षा मिळू नये, असे बऱ्याच क्रिकेटपटूंना वाटत आहे. स्मिथच्या रडण्याने तर बरेच क्रिकेटपटू व्यथित झाले आहे. त्यामुळे काही क्रिकेटपटू या दोघांना पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. यामध्ये अश्विनचाही समावेश आहे.
ट्विटरवरून आपले मत मांडताना अश्विन म्हणाला की, " या जगाला फक्त तुम्हाला रडवायचे आहे. तुम्ही रडलात की त्यांचा जीव शांत होईल आणि त्यानंतर त्यांना असुरी आनंद मिळणार आहे. " त्याचबरोबर या प्रकरणातून तुम्ही लवकर बाहेर पडा, असे अश्विनने म्हटले आहे.