सिडनीः ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक डेरेन लेहमन याच्यावर चेंडू छेडछाड प्रकरणी कुठलीच कारवाई न झाल्यानं क्रिकेटवर्तुळात आश्चर्य व्यक्त होतंय. आपल्या संघातील तीन-चार खेळाडू मिळून चेंडूशी छेडछाड करण्याचं कारस्थान रचतात आणि ते प्रशिक्षकाला माहीत नाही, असं होऊच शकत नाही, असा सूर ऐकू येतोय. परंतु, वॉकीटॉकीवरील सहा शब्दांमुळे डेरेन लेहमन या प्रकरणात निर्दोष ठरल्याची माहिती समोर आलीय.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बेनक्रॉफ्ट या त्रिकुटाचं गौडबंगाल सुरू असताना, डेरेन लेहमन बाराव्या खेळाडूशी काहीतरी बोलत असल्याचा व्हिडीओ सगळ्यांनीच पाहिला. त्यामुळे चेंडू छेडछाड प्रकरणात त्याचाही हात असल्याचा संशय बळावला. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं त्याची दखल घेत, चेंडू छेडछाडीत लेहमनचा संबंध होता का, याची चौकशी केली. तो १२ व्या खेळाडूशी - पीटर हँड्सकॉम्बशी काय बोलला होता, हे त्यांनी तपासलं. तेव्हा लेहमनचे सहा शब्द ऐकून ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचे प्रमुख जेम्स सदरलँड यांनी त्याला 'क्लीन चिट' दिली.
ऑस्ट्रेलियन त्रिकूट चेंडूशी छेडछाड करत असल्याचं पाहून, लेहमननं हँड्सकॉम्बशी वॉकीटॉकीवरून संपर्क साधला आणि ''What the f---- is going on?', असा प्रश्न केला. त्यातून, लेहमनला चेंडू छेडछाडीबद्दल काहीच कल्पना नसल्याचं स्पष्ट
स्मिथ, वॉर्नरवर वर्षभराची बंदी
चेंडू कुरतडल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची, तर चेंडू कुरतडणारा कॅमरून बेनक्रॉफ्ट याच्यावर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बुधवारी हा निर्णय जाहीर केला. दुसरीकडे बीसीसीआयनेही, या खेळाडूंवर यंदाच्या आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घातली आहे.
स्मिथ ढसाढसा रडला!
चेंडू छेडछाडीच्या प्रकारामुळे जगभरात बदनामी झालेल्या स्टीव्हन स्मिथने मायदेशी परतल्यावर देशवासियांची माफी मागितली. त्यावेळी त्याच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यासोबतच, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या डेव्हिड वॉर्नरनेही आपली चूक मान्य केली आहे.