रोहित नाईक,
वरिष्ठ उपसंपादक
अनेक नवोदितांना प्रेरित करते, शिवाय वयाच्या ३९व्या वर्षीही अनेक युवांना टक्कर देते... पण तिने आता थांबण्याचा निर्णय घेतला. २० वर्षे खेळल्यानंतर ती शनिवारी थांबलीच. तिचे नाव झूलन गोस्वामी. सन २००२ पासून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर २० वर्षांच्या शानदार कारकिर्दीत झूलनने दमदार कामगिरीच्या जोरावर अनेक मुलींना क्रिकेटच्या मैदानावर खेचले. ज्या काळात मुलींचे मैदानावर खेळणेच पटत नव्हते, त्या काळात तिने स्वप्न पाहिले होते, ते भारतासाठी खेळण्याचे.
पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्यातील चकदाहा या छोट्याशा गावात मध्यमवर्गीय कुटुंबातील झूलनचा जन्म. काही महिन्यांपूर्वीच दिग्गज क्रिकेटपटू मिताली राजने निवृत्ती घेतली. आता झूलन थांबली. दोघींच्या जाण्याने भारतीय महिला क्रिकेट संघात पोकळी निर्माण झाली आहे; कारण, आज जे खेळाडू भारतीय संघात आहेत, त्यांना प्रेरित करण्याचे काम याच दोन दिग्गजांनी केले. नवोदितांसाठी मिताली आणि झूलन कधीच वरिष्ठ खेळाडू म्हणून वागल्या नाहीत. अडलेल्या प्रत्येक मुलीसाठी त्या ‘सीनिअर’ नव्हत्या. सर्व नवोदितांच्या ड्रेसिंग रूममधील त्या जणू ‘कोच’ होत्या. त्यामुळेच त्या अखेरपर्यंत भारतीय खेळाडूंसाठी मिथू दी (मिताली) आणि झुलू दी (झूलन) बनून राहिल्या.
झूलनच्या क्रिकेटची सुरुवात रोमांचक झाली. पश्चिम बंगाल या फुटबॉलवेड्या राज्यात झूलनही सुरुवातीला हाच खेळ खेळायची. मात्र, १९९२ सालचा विश्वचषक पाहून तर ती ठार क्रिकेटवेडी झाली. तेव्हापासून तिने क्रिकेट खेळण्याचा निर्धार केला. दररोजचा कोलकातापर्यंतचा अडीच तासांचा प्रवास सुरू झाला. सन १९९७ साली भारतात झालेली महिला विश्वचषक स्पर्धा झूलनच्या कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरली. बॉलगर्ल म्हणून सीमारेषेवर असताना तिने जगातील अव्वल खेळाडूंचा खेळ जवळून पाहिला. ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कचा खेळ पाहून झूलन चक्रावली. तिला बेलिंडाने मोहित केले होते. इथूनच भारताला मिळाली सुपरफास्ट बॉलर.
कामगिरी आणि मोठे मन, झूलन दोन्ही बाबतींत महान आहे. आक्रमक फटकेबाजीने कोणत्याही गोलंदाजाचा आत्मविश्वास खचणारच; पण झूलन सांगायची -‘इतने सालों से खेल रही हूँ, तो भी मुझे चौके-छक्के पडते ही है. ये खेल है, इससे सीखना चाहिए,’ असे खुद्द झूलनने सांगितल्यावर कोणाला स्फुरण चढणार नाही? तिची कमतरता भासणार...
थँक यू झुलन !
Web Title: Ballgirl to Super Faster spacial article on team india player jhulan goswami last match vs england
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.