BAN A vs IND A : न्यूझीलंड दौऱ्यावर भारताच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली आहे. त्यातच भारताची युवा ब्रिगेड बांगलादेश दौऱ्यावर गेली आहे आणि तिथे युवा फलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे. मुंबईकर यशस्वी जैस्वाल याने भारत अ संघाकडून पदार्पण करताना शतक झळकावले, तर कर्णधार अभिमन्य इस्वरन यानेही वादळी शतकी खेळी केली आहे. बांगलादेश अ संघाचा पहिला डाव ११२ धावांवर गुंडाळल्यानंतर भारत अ संघाने २ बाद ३५२ धावा करताना दुसऱ्या दिवशी २१३ धावांची आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारतीय गोलंदाजांच्या आक्रमक माऱ्यासमोर कोणत्याच फलंदाजाचा टिकाव लागला नाही. बांगलादेशकडून मोसाद्देक हुसेनने सर्वाधिक ८८ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. तर नजमुल हुसेन शांतो याला १९ धावा करण्यात यश आले आणि तैजुल इस्लामला १२ धावा करता आल्या. याशिवाय बांगलादेशच्या कोणत्याच फलंदाजाला दोन आकडी धावसंख्या करता आली नाही. सौरभ कुमारने सर्वाधिक ४ बळी पटकावले, तर नवदीप सैनीला ३ बळी घेण्यात यश आले. याशिवाय मुकेश कुमारने २ बळी घेतले तर अतित शेठने १ बळी घेतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"