मुंबई : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधात भारतात पाकिस्तानसुपर लीगचे प्रक्षेपण थांबवण्यात आले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने त्यांच्या देशात इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल 2019) प्रक्षेपण न करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे मंत्री फवाद अहमद चौधरी यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
आयपीएलच्या १२ व्या हंगामाला २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पण पाकिस्तानमध्ये हे सामने दिसणार नाहीत. भारत सरकारने पाकिस्तान सुपर लीगला दिलेल्या वागणुकीमुळे आम्ही निराश झालो आहोत आणि त्यामुळे आयपीएलचे प्रक्षेपण येथे दाखवल्यास पाकिस्तानी जनतेला ते आवडणार नाही.
पुलवामा हल्ल्यात भारताचे ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले आणि या हल्ल्यातील सूत्रधाराला पाकिस्तानने आश्रय दिले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रचंड रोष आहे. पुलवामा हल्ल्यानंतर DSports या वाहिनीने भारतात-पाकिस्तान सुपर लीगचे प्रक्षेपण बंद केले. भारत सरकार क्रिकेटमध्ये राजकारण घुसवत असल्याचा आरोपही चौधरी यांनी केला.